औरंगाबाद हादरलं! रूम पार्टनर बाहेर जाताच मैत्रिणीला घरी बोलावलं अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2022 08:06 PM2022-05-19T20:06:48+5:302022-05-19T20:07:43+5:30
मैत्री की प्रेमसंबंधातून हत्या? घटनेपासून मित्र फरार झाला आहे.
औरंगाबाद : मैत्रिणीला खोलीवर बोलावून तिचा गळा आवळून आणि डोक्यात जड वस्तूने प्रहार करून खून केल्याची खळबळजनक घटना नारेगाव परिसरातील राजेंद्रनगरात बुधवारी सायंकाळी घडली. या घटनेनंतर तिचा मित्र पसार झाला असून, पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे.
रेणुका देविदास ढेपे (वय १९, रा. ब्रिजवाडी) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. शंकर विष्णू हगवणे (२४, मूळ रा. धानोरा, ता. लाड कारंजा, जि. वाशिम) असे संशयित मित्राचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, शंकर त्याच्या तीन मित्रांसह नारेगावात राजेंद्रनगरातील वसंतराव बनगाळे यांच्या घरात किरायाने राहतो. रेणुका ब्रिजवाडी येथे आई-वडील आणि भावासोबत राहात होती. दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे शिक्षण सोडल्याने ती घरीच होती. शंकर हा भाजीपाला विक्रीच्या व्यवसायानिमित्त नारेगाव, ब्रिजवाडीत फिरत असतो. यातून त्याची रेणुकासोबत मैत्री झाली.
बुधवारी सायंकाळी साडेपाचच्यासुमारास शंकरचे ‘रूम पार्टनर’ घरी आले तेव्हा त्यांना आतील खोलीत रेणुका रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडल्याचे दिसले. शंकरही तेथे नव्हता. त्यांनी ही माहिती तत्काळ घरमालकास फोनवर कळविली. बनगाळे यांनी पोलिसांना कळविले. पोलीस निरीक्षक विठ्ठल पोटे, सहायक निरीक्षक शिवाजी चौरे हे कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी गेले. रेणुकाच्या डोक्यात जोराचा प्रहार करून आणि दोरीने गळा आवळून खून करण्यात आल्याचे त्यांच्या नजरेस पडले. पोलिसांनी सरकारी पंचांसमक्ष घटनास्थळाचा पंचनामा केला आणि मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी घाटी रुग्णालयात रवाना केला.
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची घटनास्थळी धाव
या घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त विशाल ढुमे, सिडको विभागाचे सहायक आयुक्त निशिकांत भुजबळ यांच्यासह अन्य अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
मैत्री की प्रेमसंबंधातून हत्या?
घटनेपासून शंकर फरार झाला आहे. रेणुका यापूर्वीही एकदा, दोनदा शंकरसोबत त्याच्या खोलीवर आली होती, अशी माहिती शेजाऱ्यांनी पोलिसांना दिली. यामुळे या हत्येचा प्रमुख संशयित शंकर हाच आहे. पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे. याप्रकरणी एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात शंकरविरोधात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. पोलिसांनी त्याच्या ‘रूम पार्टनर’ कामगारांचीही कसून चौकशी सुरू केली आहे.