औरंगाबाद हादरले; एकाच कुटुंबातील सहाजणांची अंत्ययात्रा, हुंदके अन् हाहाकाराने गाव सुन्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2021 07:28 PM2021-12-31T19:28:45+5:302021-12-31T19:28:59+5:30
हृदय पिळवटून टाकणाऱ्या या अपघातात मंगरूळ येथील खेळवणे कुटुंबातील चार महिलांचा अंत झाल्याने त्या घरात आता चूल पेटविण्यासाठी महिलाच उरली नाही.
- श्यामकुमार पुरे
सिल्लोड (जि.औरंगाबाद) : काळाचा आघात किती वेदनादायी असतो, याचा थरार गुरुवारी पहाटे घडलेल्या भीषण अपघातातून पुढे आला. वऱ्हाडाला घेऊन निघालेल्या पिकअप वाहनाचा सिल्लोड-कन्नड मार्गावरील मोढा फाट्यावर ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला धडकून झालेल्या भीषण अपघातात मंगरूळ येथील एकाच कुटुंबातील सहा जणांचा अंत झाला तर तब्बल १४ जण गंभीर जखमी झाले. या अपघातातील मृतदेह उत्तरीय तपासणी केल्यानंतर नातेवाईकांच्या ताब्यात दिल्यावर गुरूवारी दुपारी मंगरूळमध्ये सहाजणांची अंत्ययात्रा एकाच वेळी निघाली. यावेळी नातेवाईकांनी फोडलेला टाहो, हुंदके अन् हाहाकाराने सर्वत्र शाेककळा पसरली होती. हृदय पिळवटून टाकणाऱ्या या अपघातात मंगरूळ येथील खेळवणे कुटुंबातील चार महिलांचा अंत झाल्याने त्या घरात आता चूल पेटविण्यासाठी महिलाच उरली नाही. तर सख्ख्या भावांचाही अंत झाला आहे. चारही कुटुंबातील मुलांवर अनाथ होण्याची वेळ आली. राज्यमंत्री अब्दुल सत्तार, उपनगराध्यक्ष अब्दुल समीर यांनी रुग्णालयात जाऊन जखमींना व मृतांना मदत करत कुटुंबांचे सांत्वन केले.
एकाच चितेवर दाम्पत्यास अग्नीडाग
मंगरूळच्या लक्ष्मीबाई अशोक खेळवणे, अशोक संपत खेळवणे व रंजनाबाई संजय खेळवणे, संजय संपत खेळवणे या दोन्ही दाम्पत्यांना एकत्र अग्निडाग देण्यात आला. जिजाबाई गणपत खेळवणे, संगीता रतन खेळवणे या दोघींवर अंत्यसंस्कार झाले. त्यांच्या स्वत:च्या शेतात एकाच ठिकाणी चार चिता रचण्यात आल्या. एकाचवेळी एकाच शेतात आणि एकाच कुटुंबातील सहा जणांच्या चिता पेटल्याने यावेळी नातेवाईकांच्या आक्रोशाने हाहाकार उडाला होता.
टाहो फुटला अन् पती बेशुद्ध
या अपघातात संगीता रतन खेळवणे यांचा मृत्यू झाला तर त्यांचा मुलगा ओमकार (१६) हा गंभीर जखमी झाला. पत्नी संगीताला अग्नीडाग दिल्यानंतर पती रतन खेळवणे हा नातेवाईकांशी बोलता बोलता खाली पडला. नातेवाईकांनी त्याला उठविल्यानंतर पुन्हा त्याची दातखिळी बसून तो बेशुद्ध पडला. त्याला तत्काळ रुग्णालयात नेण्यात आले.
वडिलांपाठोपाठ आईही गेली
अपघातातील मयत जिजाबाई गणपत खेळवणे यांच्या पतीचा दोन महिन्यांपूर्वी आकस्मिक मृत्यू झाले होते. त्यांना दोन मुले व एक मुलगी असून, या मुलांचे आई-वडिलांचे छत्र हरपल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. दुसरे मयत दाम्पत्य रंजनाबाई व संजय संपत खेळवणे यांना एकुलता एक असलेला तेरा वर्षीय शुभम अनाथ झाला.
अन् त्यांचे प्राण वाचविले
जनाबाई बाबू मोजे (६५), कांताबाई ढोरमारे (६५), विजूबाई मोजे (६५), लक्ष्मीबाई मोजे (४५), जिजाबाई जाधव (६५) (सर्व रा. मंगरूळ) हे नातेवाईक पिकअपमध्ये बसण्यासाठी गेले होते. मात्र, पिकअपमध्ये जागा नाही म्हणून चालकाने त्यांना खाली उतरवले. त्यामुळे त्यांनी चालकावर नाराजी व्यक्त केली होती.
चालकावर गुन्हा दाखल
वाहनात बसलेल्या प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, अपघातग्रस्त पिकअपचा चालक दारूच्या दशेत होता. या भीषण अपघातात तो बचावला. त्याने स्वतःला वाचविण्यासाठी डाव्या बाजूने ट्रॅक्टरला धडक दिली व घटनास्थळावरून फरार झाला. सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी पिकअप चालक संतोष किसन घोडके (रा. चांदापूर) याच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.