औरंगाबादेत दुचाकीस्वाराला चिरडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2018 12:41 AM2018-09-07T00:41:43+5:302018-09-07T00:42:23+5:30
बीड बायपासवरील अपघात रोखण्यासाठी शहर पोलिसांनी जडवाहनांना सकाळी आणि सायंकाळी प्रवेशबंदी केली. ही प्रवेशबंदी सुरू असताना गुरुवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास भरधाव जीपचालकाने दुचाकीस्वाराला चिरडले. सुसाट जीपने दुचाकीला सुमारे शंभर फूट फरपटत नेले. हा भीषण अपघात सहारा सिटीसमोर घडला.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : बीड बायपासवरील अपघात रोखण्यासाठी शहर पोलिसांनी जडवाहनांना सकाळी आणि सायंकाळी प्रवेशबंदी केली. ही प्रवेशबंदी सुरू असताना गुरुवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास भरधाव जीपचालकाने दुचाकीस्वाराला चिरडले. सुसाट जीपने दुचाकीला सुमारे शंभर फूट फरपटत नेले. हा भीषण अपघात सहारा सिटीसमोर घडला.
भगवान गंगाधर शेळके (४५, रा. शिवशाहीनगर, मुकुंदवाडी) असे मृताचे नाव आहे. एमआयडीसी सिडको पोलिसांनी सांगितले की, भगवान शेळके हे गांधेली शिवारातील सहारा सिटी येथे ठेकेदाराकडे पाच महिन्यांपासून काम करतात. नेहमीप्रमाणे गुरुवारी सकाळी साडेनऊ वाजता मोटारसायकलवरून कामावर जात होते. सहारा सिटीमध्ये जाण्यासाठी ते बायपास ओलांडत असताना जालन्याकडून देवळाई चौकाकडे सुसाट निघालेल्या जीपचालकाने त्यांना उडवले. हा अपघात एवढा भीषण होता की, भगवान यांना दुचाकीसह जीपने बायपासवरून सहारा सिटीच्या रस्त्यावर सुमारे शंभर फूट फरफटत नेले. या घटनेत भगवान हे घटनास्थळीच ठार झाले. शहरातील एका लग्न समारंभासाठी निघालेल्या या चालकाने त्याची जीप तेथेच सोडून अन्य प्रवाशांसह पळ काढला. या अपघाताची माहिती मिळताच एमआयडीसी सिडको पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. भगवान यांचा मृतदेह घाटी रुग्णालयात दाखल केला. एमआयडीसी सिडको ठाण्यात जीपचालकाविरुद्ध गुन्हा नोंदविल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुरेंद्र माळाळे यांनी दिली.
मृत भगवान यांचे मूळ गाव पैठण तालुक्यातील केकत जळगाव आहे. ते बारा वर्षांपूर्वी कामधंद्यासाठी औरंगाबादेत आले. त्यांना दोन मुले आणि दोन विवाहित मुली आहेत. एक मुलगा वाहनचालक, तर दुसरा शिक्षण घेत आहे.
मोकळ्या रस्त्याचा गैरफायदा
भगवान यांना उडविणारी जीप प्रचंड वेगात होती. रस्त्यावर जडवाहने नसल्याने मोकळा रस्ता पाहून चालकाने जीपचा वेग वाढविला. दुचाकीस्वार भगवान हे रस्ता ओलांडत असल्याचे जीपचालकाच्या लक्षात येताच त्यांनी जीपवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत उशीर झाला आणि त्याने दुचाकीला सुमारे शंभर फूट फरपटत नेले.
जडवाहनांना प्रवेशबंदी तरीही अपघात
आॅगस्ट महिन्यात पाच जणांचे बायपासवर बळी गेल्याने पोलीस आयुक्तांनी तेथील वाहतुकीचे नियमन करीत सकाळी ८ ते ११ आणि सायंकाळी ५ ते ८ या कालावधीत जडवाहनांना प्रवेशबंदी केली. प्रायोगिक तत्त्वावर ९ सप्टेंबरपर्यंत हा प्रयोग सुरू राहणार आहे, असे असताना बायपासवर आज सकाळी जीपच्या धडकेत दुचाकीस्वाराला प्राणास मुकावे लागले.