महिना झाला तरी अपहृत मुलीचा पोलिसांना शोध लागेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 06:15 PM2018-05-29T18:15:05+5:302018-05-29T18:20:08+5:30
पैठण रोडवरील कांचननगर येथील रहिवासी १५ वर्षीय मुलीचे अपहरण होऊन २७ मे रोजी महिना उलटला तरी सातारा पोलिसांना त्या मुलीचा आणि आरोपींचा शोध लावता आला नाही.
औरंगाबाद : पैठण रोडवरील कांचननगर येथील रहिवासी १५ वर्षीय मुलीचे अपहरण होऊन २७ मे रोजी महिना उलटला तरी सातारा पोलिसांना त्या मुलीचा आणि आरोपींचा शोध लावता आला नाही. उलट मुलीचा शोध घेऊ नका, असा दम संशयितांच्या नातेवाईकांनी मुलीच्या आई-वडिलांना दिला.
याविषयी अधिक माहिती अशी की, कांचननगर येथील रहिवासी १५ वर्षीय मुलगी २७ एप्रिल रोजी औरंगपुऱ्यातील एस.बी. कॉलेजमध्ये गेली होती. या मुलीचे अपहरण निखिल पागोरे याने केल्याचे पोलीस तपासात समोर आले. या अपहरणासाठी निखिलची आई आणि अन्य दोन जणांनी त्याला मदत केली. या घटनेपासून संशयित आरोपी निखिल आणि त्याची आई गायब आहे. सायबर क्राईमच्या मदतीने पोलीस त्यांचा शोध घेत असल्याचे नातेवाईकांना सांगितले जात आहे; मात्र सायबर क्राईम सेलकडून आरोपींचा ठावठिकाणा प्राप्त होताच पोलीस लगेच त्यांच्या मागावर जात नाहीत, परिणामी आरोपी तेथून दुसऱ्या ठिकाणी जातात. शिवाय ते सतत मोबाईल नंबर बदलून फिरत असतात. आरोपी हा त्याचा भाऊ, वडील आणि अन्य एका जणाच्या संपर्कात असतो. ही बाब पोलिसांना माहिती आहे, असा आरोप पीडित मुलीच्या आई-वडिलांनी केला.
मुलीच्या कुटुंबाला जिवे मारण्याची धमकी
मुलीचा शोध घेऊ नका, म्हणून आरोपीचे नातेवाईक सतत तिच्या आई-वडिलांना धमकावत आहेत. काही दिवसांपूर्वी तर तिची मोठी बहीण आणि आई पोलीस आयुक्तांना भेटण्यासाठी मोपेडने पोलीस आयुक्तालयाकडे जात असल्याचे कळताच त्यांनी अचानक त्यांच्यासमोर रिक्षा उभी केली. यामुळे मोपेडस्वार माय-लेकींना अपघात झाला. या अपघातात माय-लेकी जखमी झाल्या. २६ मे रोजी पीडितेचे आई-वडील घरी असताना कृष्णा पागोरे आणि सूर्यभान पागोरे हे घरी आले आणि त्यांनी भावाविरोधात दिलेल्या तक्रारीचा पाठपुरावा करू नका, अन्यथा तुम्हाला जिवे मारू, अशी धमकी दिली. याप्रकरणी पीडितेच्या वडिलांनी सातारा ठाण्यात तक्रार नोंदविली.