औरंगाबादमध्ये 'पोलिसांचा निवासी उजळणी कोर्स' च्या नावाखाली नुसती धूळफेक; एक मिनिटाचेही प्रशिक्षण नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2017 02:19 PM2017-12-28T14:19:53+5:302017-12-28T14:21:27+5:30
पोलीस शिपाई ते सहायक पोलीस उपनिरीक्षक यांच्यासाठी शहर पोलिसांकडून नियमित आयोजित केल्या जाणार्या निवासी उजळणी कोर्सच्या नावाखाली नुसती धूळफेक सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. उजळणी कोर्सच्या सात दिवसांच्या कालावधीत हजर असलेल्या कर्मचार्यांना एक मिनिटाचेही प्रशिक्षण देण्यात येत नाही.
- बापू सोळुंके
औरंगाबाद : पोलीस शिपाई ते सहायक पोलीस उपनिरीक्षक यांच्यासाठी शहर पोलिसांकडून नियमित आयोजित केल्या जाणार्या निवासी उजळणी कोर्सच्या नावाखाली नुसती धूळफेक सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. उजळणी कोर्सच्या सात दिवसांच्या कालावधीत हजर असलेल्या कर्मचार्यांना एक मिनिटाचेही प्रशिक्षण देण्यात येत नाही. एवढेच नव्हे, तर त्यांची परेडही घेतली जात नाही. उजळणी कोर्सचा फार्स केवळ ‘मेस’चे सहाशे रुपये वसूल करण्यासाठी केला जातो काय, असा सवाल कर्मचारी उपस्थित करीत आहेत.
गेल्या काही वर्षांपासून वाढत्या गुन्हेगारीसोबतच गुन्ह्यांच्या पद्धतीतही बदल होत आहे. सायबर गुन्हेगार आॅनलाईन पद्धतीने तुमच्या बँक खात्यावर घरबसल्या डाका टाकतो, चोर्या, घरफोड्या करण्याच्या पद्धतीतही बदल झाला आहे. गुन्हेगार आता अद्ययावत पिस्टलचा वापर करताना आढळतात. याशिवाय गुन्ह्यांचा तपास, गुन्ह्यांचा प्रकार आणि आरोपींच्या अटकेबाबतही सर्वोच्च न्यायालय, शासनाने विविध प्रकारचे निर्णय जारी केले आहेत. अनेक कायद्यांत दुरुस्त्या करण्यात आल्या आहेत. तपास अधिकार्यांचे अधिकार आणि कर्तव्य आदीबाबतीत पोलिसांनी अद्ययावत असले पाहिजे, यासाठी प्रत्येक पोलीस कर्मचार्याचा उजळणी कोर्स घ्यावा, असे आदेश पोलीस महासंचालक कार्यालयातून राज्यातील सर्व पोलीस अधीक्षक आणि पोलीस आयुक्तांना आहेत. या आदेशानुसार अनेक वर्षांपासून औरंगाबाद शहर पोलीस दलातील पोलिसांसाठी उजळणी कोर्स घेतला जातो. वर्षभरापासून मात्र शहर पोलीस दलाकडून घेण्यात येणार्या उजळणी कोर्सचा नुसता देखावा केला जात असल्याचे समोर आले आहे.
उजळणी कोर्स शिकविणारे शिक्षक बसून
शहर पोलीस प्रशासनाकडून विविध पोलीस ठाण्यांतील सुमारे ४० पोलीस कर्मचार्यांची निवासी उजळणी कोर्ससाठी निवड केली जाते. निवड झालेल्या कर्मचार्यास सोमवार ते रविवार या कालावधीत दिवस-रात्र पोलीस नियंत्रण कक्षात हजर राहणे बंधनकारक आहे.
शारीरिकदृष्ट्या त्यांना फीट ठेवण्यासाठी रोज सकाळी त्यांच्याकडून नियमित पी.टी. आणि आठवड्यातून एकदा परेड करून घेणे आवश्यक आहे; मात्र येथे ना पी.टी. होते, ना परेड. पी.टी. आणि परेड घेण्यासाठी स्वतंत्र शिक्षक आहे; परंतु ते केवळ बसून असतात.
केवळ बंदोबस्तासाठी वापर
त्यांना विविध विषयांवर बदलते कायदे आणि स्वरूप, गुन्ह्याचा तपास, सायबर क्राईम, अमली पदार्थ, नव-नवीन शस्त्रे, स्फोटके कशी हाताळावीत, याबाबत प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण या कोर्समध्ये पोलिसांना मिळणे आवश्यक असते; मात्र असे कोणतेही प्रशिक्षण कर्मचार्यांना देण्यात येत नाही. त्यांचा वापर केवळ बंदोबस्तासाठीच केला जातो.