औरंगाबाद मध्ये भाजीमंडई कुठे रस्त्यावर, तर कुठे चिखलात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2018 08:23 PM2018-06-28T20:23:10+5:302018-06-28T20:25:02+5:30

महानगरपालिकेच्या नियोजनशून्य कारभारामुळे मागील ३६ वर्षांच्या इतिहासात शहरात एकही आदर्श भाजीमंडई उभी राहिली नाही.

in Aurangabad the vegetable bazaar is located on the road and in the mud! | औरंगाबाद मध्ये भाजीमंडई कुठे रस्त्यावर, तर कुठे चिखलात!

औरंगाबाद मध्ये भाजीमंडई कुठे रस्त्यावर, तर कुठे चिखलात!

googlenewsNext
ठळक मुद्देशहरात कुठे ओट्यावर, कुठे रस्त्यांवर, तर कुठे चिखलात बसून विक्रेते भाजीपाला विकत असल्याचे चित्र आहे. 

- प्रशांत तेलवाडकर 

औरंगाबाद : आशियामध्ये सर्वात झपाट्याने वाढणारे शहर म्हणून एकेकाळी बिरुद मिरविणारे ऐतिहासिक औरंगाबाद; पण येथील महानगरपालिकेच्या नियोजनशून्य कारभारामुळे मागील ३६ वर्षांच्या इतिहासात शहरात एकही आदर्श भाजीमंडई उभी राहिली नाही. त्यामुळे कुठे ओट्यावर, कुठे रस्त्यांवर, तर कुठे चिखलात बसून विक्रेते भाजीपाला विकत असल्याचे चित्र आहे. 

ज्या जुन्या निजामकालीन भाजीमंडई  होत्या त्याही महापालिकेने उद्ध्वस्त करून टाकल्या आहेत. शहागंज व औरंगपुरा येथील भाजीमंडई सर्वात जुनी होती. शहागंजमध्ये तर अडत बाजार भरला जात होता. मात्र, विकासाच्या नावाखाली गाजर दाखवून येथील विक्रेत्यांना हटविले व भाजीमंडई जमीनदोस्त करण्यात आली.

या कारवाईला आता सात वर्षे पूर्ण होत आहेत. मात्र, अजूनही मनपा दोन्ही ठिकाणी भाजीमंडई  सुरू करू शकली नाही. सिडको एन-७ व टीव्ही सेंटर येथील भाजीमंडईच्या जागेवर शॉपिंग मार्केट उभारण्यात आले. जवाहर कॉलनीतील भाजीमंडई मनपाने उभारली, पण मागील २० वर्षांत तेथे भाजीमंडई भरलीच नाही. मुकुंदवाडीतील भाजीमंडईत सातत्याने ड्रेनेज तुंबत असते. पार्किंगची व्यवस्था नाही आणि अतिक्रमणाचाही विळखा आहे. याठिकाणीही भाजीमंडई समस्या मंडी म्हणून ओळखली जाऊ लागली आहे. 

शहागंजमध्ये चिखलात भाजीमंडई
सर्वात जुनी भाजीमंडई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शहागंजमधील महात्मा फुले फळ व भाजीपाला मंडई. येथे १९९९ पर्यंत अडत बाजार चालत होता. यामुळे शहागंज हे अर्थकारणाचे मोठे केंद्र होते. २००० यावर्षी येथील फळ व भाजीपाल्याचा अडत बाजार जाधववाडीत स्थलांतरित झाला. त्यानंतर येथे किरकोळ भाजीमंडई सुरू होती. आधुनिक भाजीमंडई बनविण्यासाठी एप्रिल २०१२ मध्ये भाजीमंडई व अडत बाजाराची दुकाने जमीनदोस्त करण्यात आली. तेव्हापासून किरकोळ विक्रेते अनधिकृतरीत्या येथील मातीच्या ढिगाऱ्यावर बसू लागले. महापालिका येथे कोणतीही सुविधा पुरवत नाही. चिखलावर पोते टाकून त्यावर भाजी ठेवून विकतात. भाजीमंडईचे प्रकरण आता न्यायालयात जाऊन पोहोचले आहे. जिथे किरकोळ भाजीमंडई भरते तिथे आता मनपाने खतनिर्मितीसाठी शेड बांधले. तेथे खतनिर्मितीऐवजी कचरा डेपो तयार झाला आहे. आसपासच्या परिसराचा उपयोग मुतारीसाठी  केला जात आहे. दुर्गंधी आणि चिखलातच येथे भाजी विकली जात आहे. 

टीव्ही सेंटरमध्ये नावालाच भाजीमंडई 
टीव्ही सेंटर येथील पोलीस चौकीच्या मागील बाजूस भाजीमंडई भरविण्यात येत होती. मात्र, त्यानंतर तेथे संजय गांधी शॉप मार्केट तयार झाले आणि भाजीमंडईच्या जागेवर विविध वस्तू विक्रीची दुकाने तयार झाली. एका कोपऱ्यात १२ भाजी विक्रेत्यांना जागा देण्यात आली आहे.  हडकोतील नवजीवन कॉलनीत भाजी विक्रेते बसतात तेही रस्त्यावरच. 

मुकुंदवाडीत समस्या मंडी 
मुकुंदवाडीतील भाजीमंडई समस्या मंडी बनली आहे. पूर्वी मुकुंदवाडीच्या मुख्य रस्त्यावरच हातगाडीवर भाजीपाला विकला जात असे. नंतर तेथून हटवून अंतर्गत मुख्य रस्त्यावर हातगाड्या उभ्या राहू लागल्या. नंतर २०१५ मध्ये मनपाने येथे ६५ शेड बांधून दिले. तसेच म्हाडा कॉलनीतही शेड बांधून दिले. मात्र पुन्हा रस्त्यावर हातगाडीवाल्यांनी अतिक्रमण केल्यामुळे भाजीमंडई बांधण्याचा काही उपयोग झाला नाही. येथे वाढलेले अतिक्रमण, सातत्याने फुटणारी ड्रेनेजलाईन, पक्के रस्ते व पार्किंग, स्वच्छतागृहाचा अभाव, अशा अनेक समस्या येथे भेडसावत आहेत. 

औरंगपुऱ्यातील भाजीमंडई स्थलांतरित 
औरंगपुऱ्यात सावित्रीबाई फुले भाजीमंडईच्या ठिकाणी मॉल उभा करण्याचा निर्णय मनपाने घेतला आहे आणि २०१२ मध्येच भाजीमंडईतील विक्रेत्यांना जवळील सुराणा कॉम्प्लेक्सच्या पाठीमागील रिकाम्या जागेत स्थलांतरित केले. १६ महिन्यांत मॉल उभारण्यासाठी मनपाने जुन्या भाजीमंडईतील शेड पाडून टाकले. आता याठिकाणी बिल्ंिडगचा सांगाडा उभा आहे. येथील काम थांबले आहे. स्थलांतरित झालेल्या व्यापाऱ्यांना मनपाने ओटे व शेड बांधून दिले. औरंगपुरा व कुंभारवाडा रस्त्यावरच भाजीपाला मिळत असल्याने ग्राहक भाजीमंडईत जाणे टाळत आहेत.

जवाहर कॉलनीतील भाजीमंडई ओस 
पुंडलिकनगर ते जयभवानीनगरपर्यंत भाजीमंडई नाही. रस्त्यावरच हातगाडीवर भाजीपाला विकला जातो. दुसरीकडे जवाहर कॉलनीत महानगरपालिकेने बांधलेली क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले भाजीमंडई मागील १८ वर्षांपासून ओस पडली आहे. येथे २१ शेड उभारण्यात आले आहेत, पण ते आतमध्ये असल्याने ग्राहक येणार नाहीत, असे कारण, पुढे करून येथे भाजी विक्रेत्यांनी येणे टाळले. परिणामी आज ही भाजीमंडई ओस पडली आहे. शहरात अभूतपूर्व कचराकोंडी निर्माण झाल्याने मागील तीन ते चार महिन्यांपासून मनपा याच भाजीमंडईत कचरा आणून टाकत आहे. 

सिडको एन-७ मधील भाजीमंडई गायब 
सिडकोतील सर्वात पहिली वसाहत एन-७ म्हणून ओळखली जाते. येथील लोकांना भाजी खरेदीसाठी शहागंजमध्येच यावे लागत होते.  त्यानंतर २० वर्षांपूर्वी भाजी विक्रेत्यांनी टपऱ्या उभारल्या. त्यानंतर भाजी विक्रेत्यांना येथे गाळे देण्यात आले. येथील भाजी मार्केट टीव्ही सेंटरला स्थलांतरित झाले. तेथे आता खाली दुकान व वरच्या मजल्यावर घर बांधण्यात आले आहे. आता येथे फळभाजी सोडून सर्व काही विक्री होते. येथील भाजीमंडईच गायब झाली. रस्त्यावरच भाजी विक्रेते बसतात. 

विक्रेते म्हणतात... मनपाने आपले आश्वासन पाळावे 
मनपाने औरंगपुऱ्यातील जुन्या भाजीमंडईच्या जागेवर मॉल उभारण्याचा निर्णय घेतला व तेथे खालच्या मजल्यावर भाजी विक्रेत्यांना दुकाने देण्याचे आश्वासन दिले होते. या अटीवर आम्ही स्थलांतरित झालोे होतो. मनपाने आश्वासन पाळावे. 
-सागर पुंड, विक्रेता, औरंगपुरा

बुटासाठी शोरूममध्ये, भाजी खरेदी चिखलात
लोक चपला, बूट खरेदीसाठी शोरूममध्ये जातात, पण ज्या भाज्या पोटात जाणार आहेत, त्या मात्र, चिखलात बसलेल्या विक्रेत्यांकडून खरेदी कराव्या लागतात. शहागंजमधील भाजीमंडईच मनपाने उद्ध्वस्त केल्याने विक्रेत्यांना नाईलाजाने चिखलात बसावे लागत आहे. मनपाने जुन्या भाजीमंडईत आता कचरा डेपो केल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे.
-शेख रफिक शेख शब्बीर, विक्रेता, शहागंज

अतिक्रमण वाढले
मुकुंदवाडी भाजीमंडईत विक्रेत्यांना शेड बांधून देण्यात आले आहे. मात्र, मागील काही वर्षात येथे चोहोबाजूने व प्रत्यक्षात भाजीमंडईतही अतिक्रमण वाढले आहे. पार्किंगला जागाच नसल्याने ग्राहक बाहेरच भाजी खरेदी करून जातात. मंडईत कमी ग्राहक येतात. 
-श्याम मुळे, विक्रेता, मुकुंदवाडी

Web Title: in Aurangabad the vegetable bazaar is located on the road and in the mud!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.