7 वर्षांनंतर औरंगाबादकरांना सांस्कृतिक मेजवानी, ख्यातकीर्त कलाकारांची मांदियाळी

By विकास राऊत | Published: February 8, 2023 07:28 PM2023-02-08T19:28:55+5:302023-02-08T19:29:02+5:30

२५ ते २७ फेब्रुवारीदरम्यान वेरूळ-अजिंठा महोत्सव

Aurangabad Verul-Ajantha Festival from 25th to 27th February, renowned artists will come | 7 वर्षांनंतर औरंगाबादकरांना सांस्कृतिक मेजवानी, ख्यातकीर्त कलाकारांची मांदियाळी

7 वर्षांनंतर औरंगाबादकरांना सांस्कृतिक मेजवानी, ख्यातकीर्त कलाकारांची मांदियाळी

googlenewsNext


औरंगाबाद: सात वर्षांपासून रेंगाळलेल्या वेरूळ-अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सवाचे २५ ते २७ फेब्रुवारीदरम्यान आयोजन करण्यात आले असून तीन दिवस ख्यातकीर्त कलाकारांची मांदियाळी या महोत्सवात असणार आहे. सोनेरी महल प्रांगणात होणाऱ्या या सांस्कृतिक मेजवानीची रूपरेषा कशी असेल, याबाबत जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत माहिती दिली.
यावेळी महोत्सवाचे मानद सल्लागार दिलीप शिंदे, पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता, मनपा आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, जीएसटी सहआयुक्त जी. श्रीकांत, पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया, जि. प. सीईओ डॉ. विकास मीना यांची उपस्थिती होती.

महोत्सवापूर्वी १२ फेब्रुवारीस संत एकनाथ रंगमंदिरात होणाऱ्या पूर्वरंग या कार्यक्रमाचे उद्घाटन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, पालकमंत्री संदिपान भुमरे, कृषिमंत्री अब्दुल सत्तार, सहकारमंत्री अतुल सावे, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह खासदार, आमदारांसह सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय मुखर्जी यांच्या उपस्थितीत होईल.

पासेस मोफत की विकत....?

या महोत्सवाचे पासेस मोफत द्यायचे की विकत, याबाबत आयोजन समितीने निर्णय घेतलेला नाही. १ हजार १२०० आसनव्यवस्था तेथे आहे. पासेस संत एकनाथ रंगमंदिर, मनपा, जिल्हाधिकारी कार्यालय, एमटीडीसी, सिडको येथे उपलब्ध करून देण्यात येतील, असे पाण्डेय यांनी सांगितले.

२५ फेब्रुवारी रोजी लावणी व जुगलबंदी
सायंकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत उद्घाटनानंतर मयूर वैद्य, मृण्मयी देशपांडे : कथ्थक, प्रार्थना बेहरे : भरतनाट्यम, भार्गवी चिरमुले : लावणी सादर करतील. पद्मभूषण पं. राशिद खान, महेश काळे यांचे शास्त्रीय गायन होईल. पद्मश्री विजय घाटे व पं. राकेश चौरसिया यांची तबला व बासरीची जुगलबंदी होईल.

२६ रोजी गायन, तालवाद्यांचा आविष्कार
सायं. ६ ते रात्री १० पर्यंत विविध कार्यक्रमांत उस्ताद शुजात हुसैन खान यांचे सतार-गायन, अमित चौबे, मुकेश जाधव तबला वादन, पद्मश्री शिवमणी यांचे तालवाद्य, रवी चारी यांचे सितार, संगीत हळदीपूर यांचे पियानो, सेल्वा गणेश यांचे खंजिरा, शेल्डन डिसिल्वा यांचे बास गिटार, आदिती भागवत कथ्थक सादर करतील.

२७ रोजी महादेवन...
सायं. ६ ते १० वाजेपर्यंत विविध कार्यक्रमांत संगीता मुजुमदार : स्ट्रींग्स एन स्टेप्स ग्रुपचे कथ्थक, नील रंजन मुखर्जीचे हवाइयन गिटारचे सादरीकरण होईल. नंतर शंकर महादेवन यांच्या गायनाची मेजवानी मिळेल.

१२ ते २३ फेब्रुवारीदरम्यान काय?
शहरात महोत्सवाचे वातावरण निर्माण व्हावे, यासाठी १२ ते २३ फेब्रुवारीदरम्यान विविध कार्यक्रम होतील. १५ रोजी क्रांती चौकात भारूडाचा कार्यक्रम होईल. १८ रोजी पैठण गेट येथे भाव-भक्तिगीतांचा कार्यक्रम होईल. २१ फेब्रुवारी रोजी दिल्ली गेट येथे झामा कव्वाल ग्रुपचे सादरीकरण होईल. सगळे कार्यक्रम रात्री ८ ते ९.३० दरम्यान होतील. २३ रोजी एमटीडीसी लॉनवर ‘श्रीमंत औरंगाबाद’ हा व्याख्यानाचा कार्यक्रम होईल.

Web Title: Aurangabad Verul-Ajantha Festival from 25th to 27th February, renowned artists will come

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.