Aurangabad Violence : पोलिसांनी झाडल्या तब्बल २६१ प्लास्टिक गोळ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 02:10 PM2018-05-14T14:10:36+5:302018-05-14T14:11:38+5:30
दंगलखोरांना वठणीवर आणण्यासाठी शहर पोलीस आणि राज्य राखीव दलाच्या जवानांनी अश्रुधुराचे शेकडो नळकांडे फोडले. त्यानंतरही दंगेखोर नियंत्रणात न आल्याने पोलिसांनी दहा तासांत तब्बल २६१ प्लास्टिक गोळ्या त्यांच्यावर झाडल्या, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली.
औरंगाबाद : दंगलखोरांना वठणीवर आणण्यासाठी शहर पोलीस आणि राज्य राखीव दलाच्या जवानांनी अश्रुधुराचे शेकडो नळकांडे फोडले. त्यानंतरही दंगेखोर नियंत्रणात न आल्याने पोलिसांनी दहा तासांत तब्बल २६१ प्लास्टिक गोळ्या त्यांच्यावर झाडल्या, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली.
शहरात ११ मे रोजी रात्री किरकोळ कारणावरून दंगलीला सुरुवात झाली. मोतीकारंजा येथून सुरुवात झालेल्या दंगलीचे लोण राजाबाजार, नवाबपुरा, चेलीपुरा, शहागंज आणि चेलीपुरा, चंपा चौक, रोशनगेटपर्यंत गेले होते. ही दंगल आटोक्यात आण्यासाठी शहर पोलिसांच्या मदतीला एसआरपीच्या सात तुकड्या शहरात दाखल झाल्या होत्या. यापैकी प्रत्यक्षात चार कंपन्याच दंगलग्रस्त भागात तैनात करण्यात आलेल्या आहेत. वारंवार आवाहन करूनही दंगलखोर ऐकत नसल्याने पोलिसांनी विविध ठिकाणी हवेतून गोळीबार केला. हवेतील गोळीबारानंतर जमाव हटत नसल्याचे पाहून शेवटी पोलिसांनी त्यांच्यावर प्लास्टिक बुलेटने गोळीबार केला.
या गोळीबारात एका तरुणाचा नवाबपुरा चौकात मृत्यू झाला. याविषयी अधिक माहिती घेतली असता राज्य राखीव दलाच्या जवानांनी दंगलखोरांविरोधात मोर्चा सांभाळल्यापासून काल दुपारपर्यंत १९७ प्लॅस्टिक गोळ्या झाडल्या, तर शहर मुख्यालयातील पोलिसांनी ६४ गोळ्या झाडल्या. याशिवाय अश्रुधुराचे शेकडो नळकांडे पोलीस आणि एसआरपीएफच्या जवानांनी फोडले.