Aurangabad Violence : पोलीस स्टेशनमध्ये तोडफोड प्रकरणी शिवसेनचे माजी खासदार जयस्वाल यांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 02:36 PM2018-05-21T14:36:43+5:302018-05-21T14:44:45+5:30
हिंसाचाराच्या घटनेत अटकेतील आरोपींना तत्काळ जामिनावर सोडा अशी मागणी करत क्रांती चौक पोलीस स्टेशनमध्ये तोडफोड केल्याप्रकरणी शिवसेनेचे माजी खासदार प्रदीप जयस्वाल यांच्या विरोधात आज गुन्हा दाखल करण्यात आला.
औरंगाबाद : हिंसाचाराच्या घटनेत अटकेतील आरोपींना तत्काळ जामिनावर सोडा अशी मागणी करत क्रांती चौक पोलीस स्टेशनमध्ये तोडफोड केल्याप्रकरणी शिवसेनेचे माजी खासदार प्रदीप जयस्वाल यांना आज दुपारी ३ वाजेच्या दरम्यान अटक करण्यात आली.
शहरात ११ व १२ मेला झालेल्या हिंसाचार प्रकरणात पोलिसांनी अनेक जणांना ताब्यात घेतले. या प्रकरणी गांधीनगर येथील दोन आरोपी क्रांती चौक पोलीस स्टेशनमध्ये अटक होती. या आरोपींना तत्काळ जामिनावर सोडा अशी मागणी करत शिवसेनेचे माजी खासदार प्रदीप जयस्वाल रविवारी रात्री ११ वाजेच्या दरम्यान क्रांती चौक पोलीस स्थानकात आले. तेथील कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी आरोपींना सोडण्यास असमर्थता दर्शवली. यावर जैस्वाल यांनी पोलीस स्थानकात गोंधळ घालत तेथील साहित्याची तोडफोड केली. या प्रकरणी त्यांच्या विरोधात ३५३, ३३२, ५०४ ,५०६, ४२७ कलमासह शासकीय मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आज दुपारी ३ वाजेच्या दरम्यान त्यांना अटक करण्यात आली.
पोलीस बंदोबस्त वाढवला
माजी खासदार जयस्वाल यांच्या अटकेच्या पार्श्वभूमीवर क्रांती चौक पोलीस स्टेशनमध्ये पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. थोड्याच वेळात त्यांना कोर्टात हजर करण्यात येणार आहे