Aurangabad Violence: जाळपोळ पोलिसांच्या मदतीनेच? 'त्या' व्हिडीओत पोलीस-दंगेखोर दिसले एकत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2018 10:20 AM2018-05-14T10:20:18+5:302018-05-14T10:23:54+5:30
जाळपोळ सुरू असताना पोलिसांनी घेतलेली बघ्याची भूमिका संशयास्पद
औरंगाबाद: दोन गटांकडून जाळपोळ सुरू असताना त्यामध्ये पोलिसांचाही सहभाग होता, हे दाखवणारा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओची चौकशी करुन संबंधित कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असं आश्वासन पोलिसांनी दिलं आहे. शुक्रवारी रात्री दोन गटांमध्ये मोठा वाद झाल्यानंतर त्यांनी जाळपोळ सुरू केली. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला होता.
जमावाकडून तोडफोड आणि जाळपोळ सुरू असताना त्यांच्यासोबत 10 पोलीस चालत होते, असं नऊ मिनिटांच्या व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसतं आहे. रस्त्याच्या बाजूला असलेल्या एका इमारतीमधून हा व्हिडीओ चित्रित करण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे जमाव वाहनं पेटवून देत असताना पोलिसांनी फक्त बघ्याची भूमिका घेतली होती. टाईम्स ऑफ इंडियानं हे वृत्त दिलं आहे. हिंसाचारानंतर खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली. त्यामुळे हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला नाही. मात्र आता हा व्हिडीओ समोर आल्यानं पोलिसांवर मोठी नामुष्की ओढावली आहे. 'हा प्रकार अतिशय गंभीर आहे. आम्ही या प्रकरणाची चौकशी करत आहोत. व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या सर्व पोलिसांवर आणि हिंसाचार करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल,' असं आश्वासन औरंगाबादचे प्रभारी पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी दिलं.
औरंगाबादमधील स्थिती नियंत्रणात आणण्याची जबाबदारी अतिरिक्त पोलीस संचालक (कायदा आणि सुव्यवस्था) बिपीन बिहारी यांच्यावर सोपवण्यात आली होती. त्यांनीही या प्रकरणी कठोर कारवाई करण्याचं आश्वासन दिलं आहे. 'कायदा हातात घेणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल. पोलीस दोषी आढळले, तर त्यांच्यावरही कठोर कारवाई केली जाईल,' असं त्यांनी सांगितलं. इमारतीच्या खिडकीतून चित्रित करण्यात आलेल्या व्हिडीओमध्ये जमाव पोलिसांसमोर गाड्या जाळताना दिसत आहेत. नवाबपुरा भागातील भारतीय नर्सिंग होम भागातील तोडफोड आणि जाळपोळ या व्हिडीओमध्ये कैद झाली आहे.