Aurangabad Violence : न्यायालयीन कोठडीतील शिवसेनेचे माजी खासदार जैस्वाल अस्वस्थपणामुळे घाटीत दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2018 15:34 IST2018-05-22T15:18:47+5:302018-05-22T15:34:00+5:30
शिवसेनेचे माजी खासदार व महानगर प्रमुख प्रदीप जैस्वाल यांना आज सकाळी छातीत त्रास होऊन अस्वस्थ वाटत असल्याने शासकीय रुग्णालय घाटी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले.

Aurangabad Violence : न्यायालयीन कोठडीतील शिवसेनेचे माजी खासदार जैस्वाल अस्वस्थपणामुळे घाटीत दाखल
औरंगाबाद : क्रांती चौक पोलीस स्टेशनमध्ये गोंधळ घातल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले शिवसेनेचे माजी खासदार व महानगर प्रमुख प्रदीप जैस्वाल यांना आज सकाळी छातीतत्रास होऊन अस्वस्थ वाटत असल्याने शासकीय रुग्णालय घाटी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांच्यावर मेडिसिन विभागाच्या अति दक्षता कक्षात उपचार सुरु आहेत.
११ व १२ मे ला शहरात झालेल्या हिंसाचाराच्या घटनेत गांधीनगर भागातील दोघा तरुणांना अटक करण्यात आली होती. रविवारी (दि.१३ )त्यांना तात्काळ जामिनावर सोडण्याच्या मागणीसाठी क्रांती चौक पोलिस ठाण्यात माजी खासदार जैस्वाल यांनी गोंधळ घातला होता. याबद्दल त्यांच्यावर गुन्हा नोंद होऊन काल दुपारी ३ च्या सुमारास अटक करण्यात आले. त्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता प्रभारी मुख्य न्यायदंडाधिकारी ए. व्ही. खारकर यांनी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.
यानंतर जैस्वाल यांनी दाखल केलेला नियमित जामिन अर्जही न्यायालयाने फेटाळला होता. यामुळे त्यांची रवानगी हर्सूल कारागृहात करण्यात आली. आज सकाळी छातीत त्रास होत असल्याने त्यांना शासकीय रुग्णालय घाटी येथे बाह्यरुग्ण विभागात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांना डॉक्टरांनी अपघात विभागात हलवले. येथे तपासण्यानंतर त्यांना मेडिसिन विभागाच्या अतिदक्षता कक्षात भरती करण्यात आले आहे. या परिसरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.