Aurangabad Violence : नगरसेवक राजेंद्र जंजाळ यांना न्यायालयीन कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 01:45 PM2018-05-19T13:45:19+5:302018-05-19T13:48:33+5:30
शहरात उसळलेल्या दंगलीच्या काळात राजाबाजार परिसरामध्ये पेंटचे दुकान आणि वाहनांची जाळपोळ केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी अटक केलेले युवा सेनेचे सचिव तथा नगरसेवक राजेंद्र जंजाळ यांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए.यू. सुपेकर यांनी शुक्रवारी (दि.१८ मे) न्यायालयीन कोठडी सुनावली.
औरंगाबाद : शहरात उसळलेल्या दंगलीच्या काळात राजाबाजार परिसरामध्ये पेंटचे दुकान आणि वाहनांची जाळपोळ केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी अटक केलेले युवा सेनेचे सचिव तथा नगरसेवक राजेंद्र जंजाळ यांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए.यू. सुपेकर यांनी शुक्रवारी (दि.१८ मे) न्यायालयीन कोठडी सुनावली.
जंजाळ यांच्या वतीने शुक्रवारी अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एस. नायर यांच्या न्यायालयात जामीन अर्ज दाखल करण्यात आला. जंजाळ यांच्या विरुद्धच्या भादंविच्या कलमांबाबत केवळ सत्र न्यायालयातच सुनावणी होऊ शकते (ट्राएबल बाय सेशन्स कोर्ट) म्हणून त्यावर उद्या १९ मे रोजी सत्र न्यायालयात सुनावणी होण्याची शक्यता आहे.
न्यायालयात बचाव पक्षाने विनंती केली की, तपास पूर्ण झाला असून, जंजाळ यांच्याकडून कोणतेही हत्यार जप्त करण्यात आले नसल्याचे अॅड. अशोक ठाकरे, अॅड. अभयसिंह भोसले व अॅड. विष्णू मदन पाटील यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. न्यायालयाने ही विनंती ग्राह्य धरून जंजाळ यांना न्यायालयीन कोठडी सुनावल्यामुळे त्यांची हर्सूल कारागृहात रवानगी करण्यात आली. सत्र न्यायालयाने पोलिसांना त्यांचे म्हणणे सादर करण्यासाठी नोटीस बजावली असून, शनिवारी या नियमित जामीन अर्जावर सुनावणी होणार असल्याचे अॅड. भोसले यांनी सांगितले.
फेरोज खान यांनाही न्यायालयीन कोठडी
एमआयएमचे विरोधी पक्षनेता फेरोज मोईनोद्दीन खान (३७, रा. बनेमियाँ दर्ग्यामागे, निजामोद्दीन रोड, बुक्कलगुडा) यांना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. एस. खांडबहाळे यांनी शुक्रवारी (दि.१८ मे) न्यायालयीन कोठडी सुनावली.
शहरात उसळलेल्या दंगलीच्या काळात दीपक मन्नालाल जैस्वाल यांच्या बियर बारच्या गोडावूनमधील विदेशी मद्याच्या साठ्याची तोडफोड करून पेटवून दिल्याच्या तसेच जैस्वाल यांचे घर पेटवून दिल्यासंदर्भात दाखल गुन्ह्यात फेरोज खान मंगळवारी (दि.१५ मे) पोलिसांना शरण आले होते. न्यायालयाने त्यांना १८ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. पोलीस कोठडीची मुदत संपल्यामुळे पोलिसांनी फेरोज खान यांना न्यायालयात हजर केले असता वरीलप्रमाणे आदेश देण्यात आला.