Aurangabad Violence : शिवसेनेच्या निषेध मोर्चास पोलिसांनी परवानगी नाकारली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 02:23 PM2018-05-18T14:23:30+5:302018-05-18T14:24:14+5:30
मुख्यमंत्री आणि राज्याच्या गृहखात्याने औरंगाबादमधील दंगलीच्या घटनेकडे दुर्लक्ष का केले, असा सवाल खैरे यांनी करत पोलीसांच्या निष्क्रियतेचा निषेध करण्यासाठी शिवसेनेने शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला होता. या मोर्चास औरंगाबाद पोलिसांनी परवानगी नाकारली.
औरंगाबाद : पोलीस आणि गृहखात्याच्या विरोधात शनिवारी शहरात निषेध मोर्चा काढण्याची घोषणा खा. चंद्रकांत खैरे आणि संपर्क प्रमुख विनोद घोसाळकर यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केली होती. या मोर्चाला औरंगाबाद पोलिसांनी परवानगी नाकारली आहे.
मुख्यमंत्री आणि राज्याच्या गृहखात्याने औरंगाबादमधील दंगलीच्या घटनेकडे दुर्लक्ष का केले, असा सवाल खैरे यांनी करत पोलीसांच्या निष्क्रियतेचा निषेध करण्यासाठी शिवसेनेने शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला होता. या मोर्चास औरंगाबाद पोलिसांनी परवानगी नाकारली.
पत्रकार परिषदेतील मुद्दे
खा. खैरे म्हणाले, शुक्रवारी रात्री शहरात झालेली दंगल दोन्ही बाजूने नव्हे तर केवळ एकाच बाजूने घडलेली आहे. आम्ही लोकांचे व पोलिसांचे दंगेखोरांपासून संरक्षण केले. परंतु आता पोलीस आमच्या लोकांना अटक करीत आहेत. त्यामुळे पोलिसांवर आमचा विश्वास राहिला नाही. दंगलीच्या रात्री पोलिसांनी निष्क्रियता दाखविली, असा आरोपही खा. खैरे यांनी केला. मिटमिट्यात जेव्हा कचऱ्यावरून वाद झाला तेव्हा १५० पोलीस अधिकारी आणि ७०० हून अधिक कर्मचारी तेथे जातात. पण इथे दंगल घडूनही मोजकेच पोलीस कर्मचारी पाठविण्यात आले, असे ते म्हणाले.
पैठणगेट येथून हा मोर्चा निघेल तो गुलमंडी, सिटीचौक, शाहगंज या मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर जाईल. पोलिसांची परवानगी असेल किंवा नसेल हा मोर्चा निघणारच, असेही खैरे यांनी स्पष्ट केले. यावेळी जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी पोलीस अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले. ही दंगल पोलीस यंत्रणेने तर घडविली नाही ना, असा संशय येतो आहे. दंगलीत सर्व रॉकेलमाफिया आणि पत्त्यांचे क्लब चालविणारेच सहभागी असल्याचा आरोप त्यांनी केला. यावेळी महापौर नंदकुमार घोडेले, जि.प. अध्यक्षा देवयानी डोणगावकर, महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल, नरेंद्र त्रिवेदी, सहसंपर्क प्रमुख अण्णासाहेब माने यांची उपस्थिती होती.
ते जखमी कुठे गेले ते शोधा
दंगलखोरांना नियंत्रणात आणण्यासाठी ३०० हून अधिक जणांवर पॅलेट गोळ्या झाडल्याचा दावा पोलीस करीत आहेत. त्या जखमींना पोलिसांनी शोधले पाहिजे. पोलिसांच्या दाव्यात तथ्य असेल तर त्या गोळ्यांमुळे जखमी झालेल्या दंगलखोरांचा शोध घेऊन त्यांना आतापर्यंत अटक करणे गरजेचे होते. परंतु पोलिसांना त्यातील बोटावर मोजण्याइतकेही दंगलखोर सापडलेले नाहीत. पोलिसांच्या या निष्क्रियतेवरून त्यांच्या भूमिकेचा अंदाज येतो, असा आरोप संपर्क प्रमुख विनोद घोसाळकर यांनी केला.