Aurangabad Violence : हिंसाचारात पोलीस पुत्राने लुटले दुकान; सीसीटीव्हीच्या फुटेजवरून एसआयटीने घेतले ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 02:09 PM2018-05-18T14:09:04+5:302018-05-18T14:09:42+5:30
दंगलीत दुकान लुटतांना पोलीस पुत्र आणि त्याचे दोन मित्र राजबाजार परिसरातील एका सीसी टीव्ही कॅमेऱ्यात अडकल्याने त्यांना एसआयटीच्या पथकाने गुरूवारी(दि़१७) ताब्यात घेतल्याची माहिती दिली
औरंगाबाद : शहरात उसळलेल्या दंगलमागे पोलिसांचा हात असल्याचा गंभीर आरोप सर्वच स्तरावरून होत असतांना आणखी एक धक्कादायक माहिती हाती आली आहे. दंगलीत दुकान लुटतांना पोलीस पुत्र आणि त्याचे दोन मित्र राजबाजार परिसरातील एका सीसी टीव्ही कॅमेऱ्यात अडकल्याने त्यांना एसआयटीच्या पथकाने गुरूवारी(दि़१७) ताब्यात घेतल्याची माहिती दिली आहे़ उमेश अंबादास लोखंडे असे पोलीस पुत्राचे नाव आहे़.
एसआयटी पथकातील सुत्राने सांगीतले की, शुक्रवारी (दि़११) जुन्या शहरात उसळलेल्या दंगलीचे लोण हे राजाबाजार परिसरा पर्यंत पोहचल्याने टोळक्यांनी दुकाने पेटविण्यासह ती लुटली़ . या दंगलीचा तपास एसआयटी पथक करत असतांना राजाबाजारातील जैन मंदिराजवळ लावलेल्या सीसी टीव्हीत तीन तरुण दुकान लुटतांना दिसून आले. हे तिघे दुचाकीवर ( क्रमांक ई डब्ल्यू ४५५) दुकानासमोर येऊन उभे राहिले़ त्यांनी दुकानात प्रवेश करून त्यातील साहित्य लुटल्याचे सीसी टीव्हीत दिसून आले़.
एसआयटीच्या पोलिसांनी या फुटेज आधारे तपास केला असता़ सीसीटीव्हीत कैद झालेल्यामध्ये उमेश लोखंडेची ओळख पटली़. उमेश हा सिटी चौक पोलीस ठाण्यात कार्यत असलेले एएसआय अंबादास लोखंडे यांचा पुत्र असल्याचे सूत्रांनी सांगीतले़ वर्षभरापूर्वी अंबादास लोखंडे यांचे निधन झालेले आहे़ . उमेशची चौकशी केली असता त्याने अजय नाडे आणि विनोद बागूल यांच्या मदतीने दुकान लुटल्याचे पथकाला सांगीतल्याने या दोघांना देखील ताब्यात घेण्यात आले आहे़.