Aurangabad Violence : पोलीस निरीक्षक हाश्मी यांची दंगलीच्या दिवशीची भूमिका तपासली जाणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 01:25 PM2018-05-19T13:25:17+5:302018-05-19T13:36:40+5:30
जिन्सी ठाण्याच्या हद्दीतील नवाबपुरा येथून हे दंगलखोर रात्रभर पोलिसांवर दगडफेक करीत होते. कर्तव्यावरील पोलीस निरीक्षक फईम हाश्मी यांनी त्या रात्री वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना आणि नियंत्रण कक्षाला दंगलखोरांविषयी अचूक माहिती न दिल्याने दंगल चिघळली, अशा अनेक तक्रारी आल्याने त्यांची चौकशी केली जाणार आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी दिली.
औरंगाबाद : जिन्सी ठाण्याच्या हद्दीतील नवाबपुरा येथून हे दंगलखोर रात्रभर पोलिसांवर दगडफेक करीत होते. कर्तव्यावरील पोलीस निरीक्षक फईम हाश्मी यांनी त्या रात्री वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना आणि नियंत्रण कक्षाला दंगलखोरांविषयी अचूक माहिती न दिल्याने दंगल चिघळली, अशा अनेक तक्रारी आल्याने त्यांची चौकशी केली जाणार आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी दिली.
११ मे रोजी रात्री गांधीनगर येथे झालेल्या किरकोळ भांडणानंतर नवाबपुऱ्यातून मोठा जमाव चाल करून आला. जमावाने केलेल्या दगडफेकीत पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांसह सामान्य नागरिक जखमी झाले. विरुद्ध बाजूने राजाबाजार येथे पोलीस उपायुक्त विनायक ढाकणे, एसआरपीचे जवान आणि अन्य पोलीस अधिकारी-कर्मचारी दंगलखोरांना रोखण्यासाठी रात्रभर प्रयत्न करीत होते. नवाबपुरा येथील दंगलखोर ऐकत नसल्याचे पाहून पोलिसांना त्यांच्यावर गोळीबार करावा लागला होता. या गोळीबारात एका मुलाचा मृत्यू झाला आणि अनेक दंगलखोर जखमी झाले.
दंगलखोरांनी वीजपुरवठा बंद केल्याने दंगलखोरांची संख्या किती आहे, याबाबतची माहितीही पोलिसांना मिळत नव्हती. नवाबपुरा एरिया जिन्सी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येतो. जिन्सी ठाण्याचे निरीक्षक फईम हाश्मी हे त्या रात्री कर्तव्यावर होते. दंगलखोरांना रोखण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. दंगलखोरांना रोखण्यासाठी अतिरिक्त कुमकही ते मागवू शकत होते. मात्र, त्यांनी नवाबपुरा येथील दंगलखोरांची संख्या किती आहे, त्यांना रोखण्यासाठी जिन्सी पोलीस काय करीत आहेत, याबाबतची माहिती वरिष्ठांना दिली नाही. परिणामी, दंगलखोर रात्रभर पोलिसांवर दगडफेक करीत होते, अशा तक्रारी आल्या आहेत. या तक्रारींच्या अनुषंगाने पो.नि. हाश्मी यांची दंगलीच्या दिवशीची भूमिका तपासली जाणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले.