Aurangabad Violence : अन् जीवाच्या भीतीमुळे अपार्टमेंट सोडून पळालो; दंगलीत सापडलेल्या कुटुंबियांची कहाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 06:46 PM2018-05-14T18:46:41+5:302018-05-14T18:47:45+5:30
राजाबाजार आणि नवाबपुरा परिसरात दंगल उसळल्यानंतर तेथील अनेक कुटुंबियांनी जीवाच्या भीतीपोटी घरे सोडून नातेवाईकांकडे आसरा घेतला.
औरंगाबाद : राजाबाजार आणि नवाबपुरा परिसरात दंगल उसळल्यानंतर तेथील अनेक कुटुंबियांनी जीवाच्या भीतीपोटी घरे सोडून नातेवाईकांकडे आसरा घेतला. त्यापैकीच समद कुटुंबीय. समद कुटुंबियांनी शुक्रवारी मध्यरात्री जीवाच्या भीतीमुळे चार मजली अपार्टमेंट सोडून नातेवाईकांकडे पूर्ण परिवार हलविला. दंगलीत उद्ध्वस्त झालेल्या मालमत्तांच्या अग्नीचे निखारे जसे धगधगत आहेत. त्याप्रमाणे अनेक कुटुंबियांच्या डोळ्यासमोरून ‘ती’ रात्र जाण्यास तयार नाही.
राजाबाजार आणि नवाबपुरा या दोन्ही वॉर्डांच्या सीमेवर समद भावंडं एकाच अपार्टमेंटमध्ये राहतात. शुक्रवारी रात्री १२ वाजेच्या सुमारास झालेल्या दंगलीपूर्वी ते एमजीएम हॉस्पिटलमधून घरी आले होते. हॉस्पिटलमध्ये त्यांच्या पुतणीवर उपचार सुरू होते. पुतणीचे निधन झाल्यामुळे दु:खात परिवार शोकसागरात बुडाला आणि इकडे परिसरातील सुरू झालेल्या दंगलीतून काही दगड त्यांच्या घरांच्या काचावर आले. दगडफेकीत अपार्टमेंटच्या काचा फुटल्या, दरवाजेही फु टले. अपार्टमेंटलगत असलेल्या घरासमोरील वाहने पेटविल्याचे त्यांच्या लक्षात आले, तसेच त्यांच्या अपार्टमेंटच्या डक्टमध्ये आग लावली. त्यामुळे अब्दुल समद, अब्दुल सलाम, अब्दुल रईस, रिझवान अहेमद यांनी तातडीने कुटुंबियांना नातेवाईकांकडे हलविण्याचा निर्णय घेतला.
हा तर भाईचाऱ्यावर हल्ला
समद यांनी सांगितले, वडिलांच्या काळापासून आमचे राजाबाजार,नवाबपुऱ्यात वास्तव्य आहे. त्यामुळे येथे भाईचाऱ्यासारखे सर्वांशी आमचे संबंध आहेत. दंगल करणाऱ्यांनी येथील भाईचाऱ्यावर हल्ला केला आहे. आमचे मित्र असलेले साईनाथ ट्रेडर्स, भारतीया हॉस्पिटलवरही त्यांनी हल्ला केला. पाणीपुरवठ्यावरून मोतीकारंजामध्ये वाद झाला मग राजाबाजार, नवाबपुऱ्यामध्ये वाद कशासाठी झाला, याचा प्रश्न आम्हाला पडला आहे. तणावपूर्ण वातावरणात रविवारी दुपारी अपार्टमेंटमधील नुकसान पाहिल्यानंतर त्या भावांचे डोळे पाणावले.