Aurangabad Violence : एमआयएम नेत्यांच्या पाहणीमुळे तणावात भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 01:23 PM2018-05-14T13:23:36+5:302018-05-14T13:24:44+5:30
जुन्या शहरातील दंगलग्रस्त भागात अजूनही अनेक दुकानांमधील आग विझलेली नाही. राखेच्या खाली आग अजूनही जळत असताना रविवारी दुपारी अडीच वाजता एमआयएम नेते राजाबाजार भागात शंभरहून अधिक तरुणांसह दाखल झाले. त्यांनी ज्या दुकानांचे नुकसान झाले त्यांची पाहणी केली.
औरंगाबाद : जुन्या शहरातील दंगलग्रस्त भागात अजूनही अनेक दुकानांमधील आग विझलेली नाही. राखेच्या खाली आग अजूनही जळत असताना रविवारी दुपारी अडीच वाजता एमआयएम नेते राजाबाजार भागात शंभरहून अधिक तरुणांसह दाखल झाले. त्यांनी ज्या दुकानांचे नुकसान झाले त्यांची पाहणी केली. पोलिसांना पंचनामे करण्याचे आदेश दिले. एमआयएम नेते, कार्यकर्त्यांचा ‘काफिला’ निघून गेल्यावर राजाबाजार भागात प्रचंड तणाव निर्माण झाला.
पोलिसांसमक्ष जमाव बंदी आदेशाचे उल्लंघन होत असताना पोलीस कारवाई का करीत नाहीत, असा सवाल दंगलीत होरपळलेल्या नागरिकांनी केला. रविवारी सकाळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी राजाबाजार परिसराला भेट देऊन पाहणी केली. यावेळी संतप्त नागरिकांनी लोकशाही पद्धतीने आपल्या भावनांना नेत्यांसमोर वाट मोकळी करून दिली.
यानंतर दुपारी अडीच वाजेच्या सुमारास शहागंज चमनमार्गे एमआयएम नेते संस्थान गणपती येथे पोहोचले. त्यांच्यासोबत किमान शंभरांहून अधिक कार्यकर्ते होते. राजाबाजार भागात आल्यावर दंगलीत होरपळलेल्या नागरिकांनी त्यांना फारसा विरोध केला नाही. ते निघून गेल्यावर राजाबाजारमधील तरुणाई अधिक संतप्त झाली.
पोलिसांसमोरच कायदा अशा पद्धतीने वेशीवर टाकला जात असेल तर आम्हीही याच पद्धतीने उत्तर देऊ, असे तरुणाईचे म्हणणे होते. जमाव बंदी आदेश लागू असताना शंभर जणांचे टोळके येथे येत असताना पोलिसांनी का अडविले नाही, असा प्रश्नही नागरिकांनी केला. पोलीस राजाबाजार भागात सकाळपासूनच पंचनामे करण्यात मग्न आहेत. त्यांचे काम सुरू असतानाही एमआयएम नेते पंचनामे करा, असा आदेश कसा काय देतात.