Aurangabad Violence : दंगली दरम्यान गुलमंडीवर दुकान जाळणे संशयास्पद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 07:41 PM2018-05-14T19:41:53+5:302018-05-14T19:42:36+5:30
शहराचे पहिले नगराध्यक्ष द्वारकादास पटेल यांच्या पुतळ्याच्या पाठीमागे शहराच्या हृदयस्थानी असलेल्या गुलमंडीवरील ऐतिहासिक अजिंठा सिल्क शोरूम शुक्रवारी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास जाळण्यात आले.
औरंगाबाद : शहराचे पहिले नगराध्यक्ष द्वारकादास पटेल यांच्या पुतळ्याच्या पाठीमागे शहराच्या हृदयस्थानी असलेल्या गुलमंडीवरील ऐतिहासिक अजिंठा सिल्क शोरूम शुक्रवारी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास जाळण्यात आले. या ठिकाणी हे एकमेव दुकान जाळले आहे. मोक्याची जागा आणि दुकानाशेजारी एका राजकीय नेत्याच्या नातेवाईकाची तीन मजली इमारत पाहता हा प्रकार संशयास्पद असल्याची कुणकुण आहे.
शहरातील राजाबाजार, नवाबपुरा, शहागंज परिसरात झालेली दंगल पूर्वनियोजित असल्याचे आरोप प्रत्यारोप होत आहेत. या दंगलीचे इतरत्र कोठेही पडसाद उमटले नाहीत. मात्र, या दंगलीचा फायदा घेत गुलमंडीवरील अजिंठा सिल्क शोरूम जाळण्यात आले. जुने लाकडी पटावाचे हे दुकान क्षणार्धात आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. दहा फुटांच्या या दुकानाला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. औरंगाबादचे वैभव सातासमुद्रापार पोहोचवणाऱ्या हिमरू शाल, बेडसीट, साडी, स्टोल आणि सिल्क ड्रेस मटेरियल याठिकाणी विक्रीला होते.
परदेशी पर्यटक शहरात आल्यानंतर औरंगाबादची आठवण म्हणून या दुकानातील हिमरू शाल विकत घेत असे. अशा ऐतिहासिक शोरूमला मोक्याची जागा खाली करण्याच्या हेतूनेच आग लावण्यात आल्याची चर्चा गुलमंडी परिसरात होत आहे. दहा फुटांच्या दुकानापैकी सात फूट दुकान रस्ता रुंदीकरणात जाणार आहे.
उरलेल्या तीन फुट जागेवर पुन्हा बांधकाम करणे शक्य नव्हते. दुकानाच्या शेजारची तीन मजली इमारत या भागातील भाजपच्या बड्या नेत्याच्या नातेवाईकाची आहे. ही तीन फुटांची जागा वापरण्यास मिळते आणि शेजारील जागेचे मूल्य व्यावसायिकदृष्ट्या वाढते. यातूनच हे अजिंठा सिल्क शोरूम जाळण्यात आल्याचे बोलले जात आहे. शोरूमचे मालक फैसल खान यांच्याशी याविषयी संवाद साधला असता, त्यांनी शोरूम अज्ञातांनी जाळले असल्याची तक्रार पोलिसांत दिल्याचे सांगितले.
दुकानमालक दबावात का?
गुलमंडीवर जाळण्यात आलेल्या दुकानाचा मलबा उचलण्याचे काम दुकानमालकाची मुले करीत होती. त्यांना या प्रकाराविषयी विचारले असता, त्यांनी काहीही बोलण्यास नकार दिला. कोणाचा दबाव आहे का? असे विचारताच नाही म्हणत त्यांचे डोळे डबडबून आले होते. याविषयी वडिलांशी संवाद साधण्याची विनंती त्यांनी केली. वडिलांनीही कोणावर संशय नसल्याचे सांगितले.