Aurangabad Violence : चौकशीत सत्य बाहेर येणार - रावसाहेब दानवे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 01:19 PM2018-05-14T13:19:11+5:302018-05-14T13:20:24+5:30
दंगलीत दोषी कोण हे न बघता त्याच्या विरोधात कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे आश्वासन भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी एका पत्रकार परिषदेत रविवारी दिले.
औरंगाबाद : शहरातील दंगलीची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. दंगल का घडली... याला जबाबदार कोण... हा पूर्वनियोजित कट होता का... या सर्व प्रश्नांची उत्तरे चौकशीत बाहेर येणार आहेत. सत्य बाहेर आल्याशिवाय राहणार नाही. दंगलीत दोषी कोण हे न बघता त्याच्या विरोधात कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे आश्वासन भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी एका पत्रकार परिषदेत रविवारी दिले.
दंगलीनंतर खा. दानवे यांनी राजाबाजार परिसराला भेट दिली. दंगलग्रस्त भागाची पाहणी करून नागरिकांशी चर्चा केली. तत्पूर्वी खा. दानवे यांच्या नेतृत्वाखालील भाजपच्या शिष्टमंडळाने प्रभारी पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना खा. दानवे म्हणाले की, दंगलीसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून पोलिसांची वाढीव कुमक पाठविण्याची मागणी केली होती. मुख्यमंत्र्यांनी तातडीने जादा पोलीस पाठविल्याने परिस्थिती नियंत्रणात आली आहे. दंगल दुर्दैवी असून, दंगल का घडली, त्याच्या मुळाशी पोलीस जाणारच आहेत. चौकशीतून दंगलीमागचे सत्य बाहेर येणार आहे. या घटनेत रॉकेल, पेट्रोल बॉम्ब, मिरची पूड, दगडांचा साठा, काचेच्या गोट्या जमा केला होत्या. दंगल पूर्वनियोजित होती का, हे आताच सांगणे योग्य ठरणार नाही. आर्थिक मदत केली जाईल, असे दानवे यांनी नमूद केले.
शहराची परिस्थिती पूर्वपदावर येऊन शांतता नांदावी, यासाठी सर्व राजकीय पक्ष व जनतेने एकत्रितरीत्या प्रयत्न करावेत, असे आवाहनही खा. दानवे यांनी केले. कचऱ्यावरून शहरात दंगल, नळ कनेक्शन कापण्यावरून दंगल होते. सर्व दंगलीचा केंद्रबिंदू महापालिकाच का? या प्रश्नालाही दानवे यांनी बगल दिली. यावेळी आ. अतुल सावे, आ. नारायण कुचे, शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी, प्रदेश प्रवक्ते शिरीष बोराळकर, जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव, माजी नगरसेवक अनिल मकरिये उपस्थित होते.