Aurangabad Violence : दंगलीत होरपळलेल्यांना शासकीय मदतीची घोषणा का नाही?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 05:48 PM2018-05-15T17:48:20+5:302018-05-15T17:48:31+5:30
ऐतिहासिक औरंगाबाद शहराने शुक्रवारी मध्यरात्री मोठी दंगल बघितली. दंगलीत दोन निष्पाप नागरिकांचा बळीही गेला. दंगलीनंतर राजकीय मंडळींडून पाहणीचे सोपस्कर पूर्णही करण्यात आले.
औरंगाबाद : ऐतिहासिक औरंगाबाद शहराने शुक्रवारी मध्यरात्री मोठी दंगल बघितली. दंगलीत दोन निष्पाप नागरिकांचा बळीही गेला. दंगलीनंतर राजकीय मंडळींडून पाहणीचे सोपस्कर पूर्णही करण्यात आले. दंगलीच्या ४८ तासांनंतरही राज्य शासनाकडून मदतीची कोणतीच घोषणा करण्यात आलेली नाही. यापूर्वी राज्यात दंगल उसळल्यानंतर दुसऱ्याच क्षणाला शासनाकडून मदत जाहीर झालेली आहे. औरंगाबादच्या बाबतीत राज्य शासन वेट अॅण्ड वॉचची भूमिका का घेत आहे, असा संतप्त सवाल दंगलीत होरपळलेल्या नागरिकांसह व्यापाऱ्यांकडून करण्यात येत आहे.
दंगलीत ज्या व्यापाऱ्यांची दुकाने जळून खाक झाली आहेत, त्यातील बहुतांश व्यापारी उधारीत माल आणणारे आहेत. अनेकांनी तर विमाही काढलेला नाही. शेकडो वाहने जळाली. त्यातील ९० टक्के वाहनांचा विमा काढलेला नाही. दंगलीत कोट्यवधी रुपयांची मालमत्ता जळून खाक झाली. मोठे व्यापारी हा त्रास सहन करू शकतील. मात्र, छोट्या व्यापाऱ्यांचे काय? त्यांना आर्थिक मदत कोण करणार... ज्या नागरिकांची घरे जाळण्यात आली. ती कुटुंबे उघड्यावर आली. त्यांना शासन सढळ हाताने मदत करणार नाही का...? असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत.
दंगलीत दोन निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागला. त्यात एक १७ वर्षीय तरुण होता. या कुटुंबियांना अद्याप शासनाने आर्थिक मदत जाहीर केलेली नाही. यापूर्वीच्या अनेक दंगलींमध्ये राज्य शासनानेच मदतीची घोषणा केली आहे. दंगलीच्या ४८ तासांनंतरही शासनाने घोषणा का केली नाही. गृहराज्यमंत्र्यांसह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनीही दंगलग्रस्त भागाची पाहणी केली. पोलिसांनी प्राथमिक पंचनामे तयार करून अहवालही पाठवून दिला.