वार्षिक ३०० कोटींची उलाढाल असणारे औरंगाबाद जिल्ह्यातील ९५ बाजाराचे बेहाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 06:52 PM2018-02-27T18:52:55+5:302018-02-27T18:56:33+5:30

मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यात ९५ आठवडी बाजार  भरतात. त्यांची एकूण वार्षिक उलाढाल तब्बल ३०० कोटींपेक्षा अधिक आहे. गावांच्या अर्थकारणाचा केंद्रबिंदू बनलेले हे आठवडी बाजार मात्र विकासापासून कोसो मैल दूर आहेत.

Aurangabad, which has an annual turnover of 300 crores, accounted for 95 markets poor | वार्षिक ३०० कोटींची उलाढाल असणारे औरंगाबाद जिल्ह्यातील ९५ बाजाराचे बेहाल

वार्षिक ३०० कोटींची उलाढाल असणारे औरंगाबाद जिल्ह्यातील ९५ बाजाराचे बेहाल

googlenewsNext
ठळक मुद्देथेट शेतकरी-ग्राहक आठवडी बाजारचा राज्य सरकार मोठा गाजावाजा करीत आहे. त्यासाठी मोठा खर्चही करण्यात येत आहे. आजही बहुतांश आठवडी बाजार रस्त्यावर, मोकळ्या जागेत भरविले जातात. या बाजारामध्ये मूलभूत सुविधा निर्माण करण्यास राज्य सरकार अपयशी ठरले आहे. 

- प्रशांत तेलवाडकर

औरंगाबाद : मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यात ९५ आठवडी बाजार  भरतात. त्यांची एकूण वार्षिक उलाढाल तब्बल ३०० कोटींपेक्षा अधिक आहे. गावांच्या अर्थकारणाचा केंद्रबिंदू बनलेले हे आठवडी बाजार मात्र विकासापासून कोसो मैल दूर आहेत. कारण, आजही बहुतांश आठवडी बाजार रस्त्यावर, मोकळ्या जागेत भरविले जातात. या बाजारामध्ये मूलभूत सुविधा निर्माण करण्यास राज्य सरकार अपयशी ठरले आहे. 

थेट शेतकरी-ग्राहक आठवडी बाजारचा राज्य सरकार मोठा गाजावाजा करीत आहे. त्यासाठी मोठा खर्चही करण्यात येत आहे. मात्र, वर्षानुवर्षे गावात भरणार्‍या आठवडी बाजाराकडे दुर्लक्ष केले जात आहे. शहरात आठवडी बाजारांची आवश्यकता आहे; पण ग्रामीण अर्थकारणाचे केंद्रबिंदू असलेल्या आठवडीबाजारात पायाभूत सुविधा निर्माण करून देण्यासाठी ना राज्य सरकार प्रयत्न करते ना स्थानिक ग्रामपंचायत, नगरपालिका प्रयत्न करते. यामुळे मागील वर्षानुवर्षे सुरूअसलेल्या आठवडी बाजारात ‘विकास’ कधी पोहोचलाच नाही.

औरंगाबाद जिल्ह्याचा विचार केला, तर येथील ९ तालुक्यांत मिळून ९५ आठवडी बाजार भरतात. त्यातील ४ आठवडीबाजार शहरात आहेत. याशिवाय औरंगाबाद तालुक्यात ७, फुलंब्री ७, सिल्लोड १२, पैठण ११, खुलताबाद ६, कन्नड १२, वैजापूर १६, गंगापूर १४ तर सोयगाव तालुक्यात ६ आठवडीबाजार भरविले जातात. या आठवडी बाजारांमध्ये स्थानिक व आसपासच्या पंचक्रोशीतील शेतकरी व व्यापारी कृषी माल व इतर साहित्य विक्रीसाठी आणतात. ताज्या भाजीपाल्यापासून ते कापसापर्यंत व कटलरीपासून ते मोबाईल एक्सेसरीज येथे विक्रीसाठी आणले जाते. या आठवडी बाजारचे महत्त्व लक्षात घेऊन  कृषी साहित्य उत्पादक कंपन्या, कीटकनाशक, बी-बियाणे कंपन्याही उत्पादन विक्रीसह येथे प्रचार-प्रसारासाठी येतात.

९५ आठवडी बाजारात मिळून वार्षिक ३०० कोटींपेक्षा अधिक उलाढाल होत असते. यावरून येथील अर्थकारणाचा अंदाज येऊ शकतो. बहुतांश आठवडी बाजार रस्त्यावर, गावातील मोकळ्या जागेत, मातीत, चिखल, नाल्याच्या बाजूला भरविले जातात. शेतकर्‍यांना, विक्रेत्यांना शेतीमाल विक्रीसाठी ओटे नाहीत. पत्र्याचे शेड तर दूरच राहिले. बांबूला ताडपत्री बांधून विक्रेते येथे व्यवसाय करीत असतात. पिण्याचे पाणीही विकत घ्यावे लागते.  बसण्याची जागाही स्वच्छ करून घ्यावी लागते. बहुतांश ठिकाणी लाईटची व्यवस्था नसल्याने सायंकाळ होताच विक्रेत्यांना व्यवसाय गुंडाळावा लागतो. ग्रामपंचायती, नगरपालिका फक्त आठवडी बाजाराचा ठेका देण्यापुरत्याच काम करतात. बाकी सोयीसुविधा पुरविण्याकडे दुर्लक्ष केले जाते. दोन वर्षांपूर्वी आठवडी बाजारांमध्ये पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी सरकारने योजना आणली होती; पण ‘कागदा’वरच राहिली. 

आठवडी बाजार सशक्तीकरणाचा निर्णय 
शेतकर्‍यांचे उत्पन्न दीडपट करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १९ व २० फेब्रुवारी रोजी नवी दिल्ली येथे राष्ट्रीय परिषद घेतली. यात देशातील २५० कृषी संशोधक, प्रशासकीय अधिकार्‍यांचा समावेश होता. राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांच्या नेतृत्वाखाली मी या परिषदेत सहभागी झालो होतो. देशातील आठवडीबाजार सशक्तीकरण करण्याचा निर्णय या परिषदेत घेण्यात आला. यासाठी २ हजार आठवडी बाजारात पथदर्शी प्रकल्प  राबविण्यात येणार आहे. या आठवडीबाजारातही ई-मार्केटिंग सुरू करण्याचा निर्णय पंतप्रधानांनी घेतला.
-भगवानराव कापसे, गटशेती प्रणेते

शहरातील आठवडी बाजाराचे हाल
जिल्ह्यातील ग्रामीण भागात ९१ आठवडी बाजार भरविले जातात. औरंगाबाद शहरात ४ आठवडीबाजार वर्षानुवर्षापासून भरविले जात आहेत. रविवारचा जाफरगेट येथील आठवडी बाजार, सोमवारी पीरबाजार, गुरुवारी छावणीतील आठवडी बाजार, तर शुक्रवारी चिकलठाणा येथे आठवडी बाजार भरतो. यात छावणी परिषदेने विक्रेत्यांसाठी ओटे व पत्र्याचे शेड उभारले आहे. तसेच पीरबाजार येथे पत्र्याचे शेड व सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात आले आहे. जाफरगेट व चिकलठाणा येथील आठवडीबाजारात मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या नाहीत. पडलेले ओटे, तुटलेले पत्र्याचे शेड, पिण्याचा पाण्याचा अभाव येथेही आहेच. 

कोणत्या वाराच्या दिवशी किती आठवडी बाजार भरविले जातात. 
१) रविवार -    १७
२) सोमवार-    ८
३) मंगळवार-    १३
४) बुधवार-    १६ 
५) गुरुवार-    १८ 
६) शुक्रवार-    १३
७) शनिवार-    १०

Web Title: Aurangabad, which has an annual turnover of 300 crores, accounted for 95 markets poor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.