पत्नी पीडितांनी संन्यासी वेशभूषेत काढली दिंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2018 06:35 PM2018-11-20T18:35:09+5:302018-11-20T18:37:26+5:30
जागतिक पुरुष हक्क दिनानिमित्त पत्नी पीडित पुरुष आश्रमातर्फे क्रांतीचौक ते विभागीय आयुक्तालयापर्यंत संन्यासी वेशभूषेत पायी दिंडी काढण्यात आली होती.
औरंगाबाद : जागतिक पुरुष हक्क दिनानिमित्त पत्नी पीडित पुरुष आश्रमातर्फे क्रांतीचौक ते विभागीय आयुक्तालयापर्यंत संन्यासी वेशभूषेत पायी दिंडी काढण्यात आली होती. या अनोख्या आंदोलनाने क्रांतीचौक ते विभागीय आयुक्तालयापर्यंतच्या मार्गावरील सर्व नागरिकांचे लक्ष वेधले होते.
पुरुषांवरील वाढत्या अत्याचारामुळे बहुतांश पत्नी पीडितांसमोर आत्महत्या, तुरुंगवास अथवा संन्यास हेच पर्याय दिसतात. त्यापैकी संन्यास घेणेच योग्य वाटू लागले आहे, त्यामुळे संघटनेने पुरुष हक्क दिन ‘संन्यास दिन’ म्हणून पाळून पायी दिंडी काढल्याचे संघटनेतर्फे सांगण्यात आले.
जिल्ह्यात स्वतंत्ररीत्या पुरुष तक्रार केंद्र स्थापन करण्याच्या प्रमुख मागणीसाठी या दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. संघटनेने विभागीय आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, १९ नोव्हेंबर हा जागतिक पुरुष हक्क दिन आहे. ३० देशांमध्ये हा दिन साजरा केला जातो. स्त्री सशक्तीकरणाची जाणीव व्हावी म्हणून महिला दिन साजरा करण्यात येतो. त्याच प्रमाणे पुरुषांमध्ये देखील जागरूकता व्हावी, पुरुषांना समाजात मानाचे स्थान मिळावे. पुरुषावर पत्नीकडून होणाऱ्या छळात वाढ होत आहे.
यामुळे अनेक संसार उद्ध्वस्त झाले आहेत. होतकरू स्त्री-पुरुषांचे नुकसान होत आहे. महिलांसाठी वेगवेगळे कायदे प्रचलित असून, पुरुषांच्या बाजूने कायद्यांचा आधार अत्यल्प आहे. पुरुष खचून अखेरीस आत्महत्येकडे वळण्याचे प्रमाण वाढत आहे. या अनोख्या आंदोलनात संघटनेचे अध्यक्ष भारत फुलारे, प्रमोद तरवटे, प्रवीण गाले, संजय नरवडे, चरणसिंग दुसिंगे, विशाल नांदरकर आदींनी सहभाग नोंदविला.
पत्नी पीडितांच्या मागण्या अशा
पुरुषांसाठी स्वतंत्र पुरुष आयोग स्थापन करावा. घरगुती हिंसाचारापासून पुरुषांचे संरक्षण अधिनियम लागू करावा. वाढत्या लिंग भेदाला आवर घालावा. कौटुंबिक वाद न्यायालयात गेल्यास एक वर्षात निकाल लागावा. प्रत्येक पोलीस ठाण्यात लायडिटेक्टरची सक्ती करावी. पोटगी भरण्यास असमर्थ असणाऱ्या व्यक्तीस जेलमध्ये न पाठविता शासकीय नोकरीत समाविष्ट करावे. सर्व शासकीय कार्यालयांमध्ये पुरुष हक्क दिन साजरा करण्यात यावा.