राष्ट्रीय अॅथलेटिक्स स्पर्धेत औरंगाबादच्या साक्षीला ३ मेडल्स
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 12:52 AM2018-01-22T00:52:32+5:302018-01-22T00:52:49+5:30
रत्नागिरी येथे आज झालेल्या राष्ट्रीय शालेय अॅथलेटिक्स स्पर्धेत औरंगाबादची प्रतिभावान उदयोन्मुख अॅथलिट साक्षी चव्हाण हिने १४ वर्षांखालील मुलींच्या गटात जबरदस्त कामगिरी करीत तीन पदके जिंकत आपला विशेष ठसा उमटवला.
औरंगाबाद : रत्नागिरी येथे आज झालेल्या राष्ट्रीय शालेय अॅथलेटिक्स स्पर्धेत औरंगाबादची प्रतिभावान उदयोन्मुख अॅथलिट साक्षी चव्हाण हिने १४ वर्षांखालील मुलींच्या गटात जबरदस्त कामगिरी करीत तीन पदके जिंकत आपला विशेष ठसा उमटवला.
साक्षी चव्हाण हिने २०० मीटर धावण्याच्या शर्यतीत २५.८ सेकंद वेळ नोंदवत सुवर्णपदकाची कमाई केली. त्याचप्रमाणे तिने १०० मीटर धावण्याच्या शर्यतीतही जबरदस्त कामगिरी करीत रौप्यपदक जिंकले. त्याचप्रमाणे ४ बाय १०० मीटर रिलेत तिने ४६.८ सेकंदांची वेळ नोंदवत महाराष्ट्राला कास्यपदक जिंकून देण्यात निर्णायक योगदान दिले. साक्षी चव्हाण हिने गतवर्षी नागपूर येथील राज्यस्तरीय अॅथलेटिक्स स्पर्धेत २०० मीटरला सुवर्ण आणि १०० मीटर धावण्याच्या शर्यतीत रौप्यपदक जिंकले होते. तसेच त्याचवर्षी तिने पुणे येथील सबज्युनिअर स्पर्धेत १०० मीटर धावण्याच्या शर्यतीत रौप्यपदकाची कमाई केली होती. साक्षी चव्हाण ही क्रीडा प्रबोधिनीची विद्यार्थिनी असून, गारखेडा परिसरातील विभागीय क्रीडा संकुलावर प्रशिक्षक सुरेंद्र मोदी आणि प्रशिक्षिका पूनम नवगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. या जबरदस्त कामगिरीबद्दल तिचे क्रीडा उपसंचालक व क्रीडा प्रबोधिनीचे प्राचार्य राजकुमार माहादावाड, क्रीडा अधिकारी चंद्रशेखर घुगे, मनपा क्रीडा अधिकारी संजीव बालय्या यांनी अभिनंदन केले आहे.