औरंगाबादच्या महिलांचा पाण्यासाठी मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2018 12:39 AM2018-04-18T00:39:51+5:302018-04-18T00:41:46+5:30
मनपाने दोन दिवसाआड पाणी द्यावे, किमान १ तास तरी पाणी द्यावे आदी मागण्यांसाठी सुरेवाडीतील संतप्त महिलांनी चक्क सिडको एन-७ येथील पाण्याच्या टाकीवर हल्लाबोल केला. आठ दिवसांत पाणी प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन महापौर नंदकुमार घोडेले यांनी दिल्यावर महिलांनी आंदोलन मागे घेतले.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : मनपाने दोन दिवसाआड पाणी द्यावे, किमान १ तास तरी पाणी द्यावे आदी मागण्यांसाठी सुरेवाडीतील संतप्त महिलांनी चक्क सिडको एन-७ येथील पाण्याच्या टाकीवर हल्लाबोल केला. आठ दिवसांत पाणी प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन महापौर नंदकुमार घोडेले यांनी दिल्यावर महिलांनीआंदोलन मागे घेतले.
मंगळवारी सकाळी सुरेवाडी भागातील १०० हून अधिक महिला, नगरसेवक सीताराम सुरे यांच्यासह पाण्याच्या टाकीवर धडकल्या. रिकामे हंडे घेऊन आलेल्या महिलांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर त्यांनी सिडको एन-७ येथील पाण्याच्या टाकीवरून जवळच असलेल्या एन-७ येथील पाणीपुरवठा कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले. सुरेवाडी भागात अल्पदाबाने फक्त ४५ मिनिटेच पाणी येते. त्यामुळे अनेक घरांना पाणीच मिळत नाही. पाण्याची वेळ एक तास करण्यात यावी. पूर्वीप्रमाणे दोन दिवसाआड पाणी द्यावे, अशा मागण्यांचे निवेदन महापौरांना देण्यात आले. महापौरांनी सिडको एन-७ आणि एन-५ येथील पाणी वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. आठ दिवसांत पाणीप्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले.
यावेळी सेनेचे शहराध्यक्ष बाळू थोरात, विभागप्रमुख गणेश सुरे, शाखाप्रमुख रमेश सूर्यवंशी, संजय नवले, अपर्णा रामावत, सुदर्शन पवार, सुरेखा निर्मळ, पुष्पा चव्हाण, भागूबाई विघाटे, नम्रता पवार, कुसुम मिसाळ, कविता कोलते, कांताबाई राजपूत आदींची उपस्थिती होती.