राज्य अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत औरंगाबादचा विजयी प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2017 01:02 AM2017-12-25T01:02:33+5:302017-12-25T01:02:42+5:30
चिपळूण येथे सुरू असलेल्या १८ वर्षांखालील राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी चषक खो-खो स्पर्धेत औरंगाबाद संघाने मुलींच्या गटात विजयी प्रारंभ केला.
औरंगाबाद : चिपळूण येथे सुरू असलेल्या १८ वर्षांखालील राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी चषक खो-खो स्पर्धेत औरंगाबाद संघाने मुलींच्या गटात विजयी प्रारंभ केला. मुलींच्या ‘क’ गटातील सामन्यात औरंगाबादची परभणीवर (१२-३, ०-४) १२-७ अशी १ डाव व ५ गुणांनी सरशी झाली. औरंगाबादच्या विजयात रेणुका मोकासे (२.४० मि.), रूपाली वाघ (१ मि. नाबाद, ३.१० मि. व ३ गडी) व आफ्रिन शेख (३.४० मि.) यांचा मोलाचा वाटा होता.
याच गटात गतविजेत्या पुण्याने जालना संघावर (२२-३, ०-४) २२-७ अशी १ डाव व १५ गुणांनी आरामात मात केली. पुण्याच्या प्रियंका इंगळेने ३ मि. संरक्षण करून ५ गडी बाद केले, तर साक्षी वाघ व स्नेहल जाधवने प्रत्येकी ५ गडी बाद केले.
कुमार गटात गतवर्षीच्या उपविजेत्या मुंबई उपनगरने रायगड संघावर (१०-४, ०-३) १०-७ असा १ डाव व ३ गुणांनी पराभव करून दिमाखात सुरुवात केली. ‘अ’ गटातील सामन्यात गतविजेत्या ठाणे संघाने जळगावचा (१९-४, ०-७) १९-११ असा १ डाव व ८ गुणांनी पराभव करून या वर्षीच्या मोहिमेची विजयी सुरुवात केली. ‘क’ गटात पुण्याने नंदुरबारवर (१६-२, ०-३) १६-५ अशी १ डाव व ११ गुणांनी मात केली.