शासनाच्या अनुदानाचे २५ कोटी संपताच कचरा प्रक्रियेचे काम ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2019 06:14 PM2019-07-11T18:14:39+5:302019-07-11T18:14:39+5:30
शासनाकडून अनुदानाचा दुसरा टप्पा आला नाही
औरंगाबाद : चिकलठाणा येथे १५० मेट्रिक टन क्षमतेचा प्रकल्प उभारण्यात आला. मात्र आता पडेगाव आणि नक्षत्रवाडी येथे कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारणीचे काम निधीअभावी ठप्प पडले आहे.
शहरातील सर्व कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्यासाठी मनपाला १४० कोटी रुपये खर्च येणार आहे. शासनाकडून आलेले २५ कोटी रुपये खर्च झाले आहेत. मनपाने मागील महिन्यातच शासनाकडे सुधारित डीपीआर सादर केला. या डीपीआरची शहानिशा करण्यासाठी शासनाचे एक पथकही शहरात आले होते. या पथकाने अत्यंत बारकाईने सर्व कामकाजाची पाहणी केली होती. या पथकाच्या अहवालावर पुढील निधी शासनाकडून देण्यात येणार होता. पथक रवाना होऊन आठवडा उलटला तरी मनपाला दुसऱ्या टप्प्यातील अनुदान मिळालेले नाही. पडेगाव आणि नक्षत्रवाडी येथे शेड उभारणीचे काम सुरू आहे. दोन्ही ठिकाणी सुरू असलेल्या कामाला किमान ४० ते ४५ कोटी रुपये लागणार आहेत. शासनाकडून आलेला निधी संपल्याने कंत्राटदारानेही काम जवळपास बंद केले आहे.
मनपा पडेगाव येथेही १५० मॅट्रिक टन क्षमतेचा कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारणार आहे. नक्षत्रवाडी येथे कचऱ्यापासून वीजनिर्मितीचा प्रयोग करण्यात येईल. या प्रकल्पाला हॉटेलमधील खराब अन्न, ओला कचरा, सडलेला भाजीपाला लागणार आहे. भविष्यात महापालिका हा कचरा संकलित करण्यासाठी स्वतंत्र रिक्षांची नेमणूक करणार आहे.
कंपनीचे पैसे अडकले
चिकलठाणा येथे सध्या कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या मायोवेसल्स या कंपनीने स्वत:च्या खिशातील कोट्यवधी रुपयांची यंत्रसामुग्री बसविली आहे. दहा वर्षे कचऱ्यावर प्रक्रिया करण्याची जबाबदारीही मनपाने याच कंपनीवर सोपविली आहे. या कंपनीलाही यंत्रसामुग्री बसविण्याचे पैसे मनपाने दिलेले नाहीत.