औरंगाबादच्या तरुणाचा राष्ट्रपती पदासाठी उमेदवारी अर्ज; मतांसाठी केजरीवाल, शिंदेंना भेटणार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2022 06:12 PM2022-06-25T18:12:14+5:302022-06-25T18:17:33+5:30
यापूर्वी त्याने नगरसेवक, पदवीधर मतदारसंघ, लोकसभा निवडणूक लढवली आहे, आता थेट राष्ट्रपती पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
औरंगाबाद: शहरातील सिडको भागात राहणाऱ्या एका तरुणाने चक्क राष्ट्रपती पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. विशाल उद्धव नांदरकर असे या तरुणाचे नाव आहे. सामाजिक कार्यात सक्रीय असलेला विशालच्या उमेदवारी अर्ज दाखल केलायची पावती सध्या सोशल मिडीयावर व्हायरल झाली आहे. विशाल सध्या दिल्ली येथेच असून मतांसाठी विविध पक्षांच्या नेत्यांच्या भेटी घेत आहे. दिल्लीचे मुखमंत्री अरविंद केजरीवाल, शिवसेनेचे बंडखोर एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन मत देण्यासाठी विनंती करणार असल्याची माहिती त्याने दिली आहे.
देशातील सर्वौच्च पद असलेल्या राष्ट्रपती पदासाठी निवडणूक प्रक्रिया सुरु झाली आहे. या निवडणुकीत उमेदवारी अर्ज कोण दाखल करतो याकडे संपूर्ण देशाचे लक्ष असते. राजकीयदृष्ट्या महत्वाचे असलेले या पदासाठी केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपा आघाडीने आणि विरोधकांनी मतांचे गणित मांडत आपले उमेदवार निवडणुकीत उतरवले आहेत. दरम्यान, औरंगाबाद येथील विशाल नांदरकर या तरुणाने देखील आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. थेट राष्ट्रपती भवन गाठत विशालने राष्ट्रपती पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. पात्रतेचे सर्व निकष पूर्ण करत असल्याने उमेदवारी अर्ज दाखल केल्याची माहिती विशालने दिली. तसेच देशातील सर्व पक्ष, लोकप्रतिनिधींना मत देण्याचे आवाहन त्याने केले आहे.
अनुमोदकांची नावे गुपित
उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी १५ हजार रुपये अनामत रक्कम भरावी लागते. तसेच अर्जावर ५० लोकप्रतिनिधींच्या सह्या अनुमोदक म्हणून आवश्यक असतात. ५० लोकप्रतिनिधींच्या सह्या घेऊन अर्ज दाखल केला आहे. त्या अनुमोदकांची नावे गुप्त आहेत असे विशालने सांगितले. तसेच छाननीमध्ये माझा अर्ज वैध ठरेल,असा विश्वास देखील विशालने व्यक्त केला आहे. त्यामुळे विशालचा अर्ज बाद होतो की निवडणुकीच्या रिंगणात राहतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरत आहे.
मतांसाठी एकनाथ शिंदे, केजरीवालांना भेटणार
अर्ज दाखल केल्यापासून विशाल दिल्ली येथे आहे. मतांची जुळवाजुळव करण्यासाठी विशालने कंबर कसली आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना भेटून आप पक्षाचे मते देण्याची विनंती करणार असल्याचे विशाल म्हणाला. तसेच महाराष्ट्रातील शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांची गुवाहाटी येथे भेट घेऊन त्यांच्या गटाचे मत मिळविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्याने सांगितले.
नगरसेवक ते राष्ट्रपती, सर्वच निवडणुकीत अर्ज
विशाल हा शहरात विविध सामाजिक कार्यात सक्रीय असतो. त्याने आतापर्यंत महापालिका निवडणू गुलमंडी वॉर्ड येथून लढवली आहे. तसेच विधानसभा, लोकसभा आणि पदवीधर निवडणुका देखील त्याने लढवल्या आहेत. राष्ट्रपतीपदाची मागील निवडणूक वय पूर्ण होत नसल्याने लढता आली अशी खंत विशालने व्यक्त केली.