औरंगाबाद जिल्हा परिषदच्या १ लाख ४४ हजार विद्यार्थ्यांना मिळणार दोन गणवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2018 07:47 PM2018-06-28T19:47:50+5:302018-06-28T19:49:56+5:30

जि. प. शाळांमध्ये पहिली ते आठवीच्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या १ लाख ४४ हजार १८ विद्यार्थ्यांना दोन गणवेश देण्यासाठी प्रतिविद्यार्थी ६०० रुपये मिळणार आहेत.

Aurangabad Zilla Parishad's one lakh 44 thousand students will get two uniforms | औरंगाबाद जिल्हा परिषदच्या १ लाख ४४ हजार विद्यार्थ्यांना मिळणार दोन गणवेश

औरंगाबाद जिल्हा परिषदच्या १ लाख ४४ हजार विद्यार्थ्यांना मिळणार दोन गणवेश

googlenewsNext

- राम शिनगारे 

औरंगाबाद : जि. प. शाळांमध्ये पहिली ते आठवीच्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या १ लाख ४४ हजार १८ विद्यार्थ्यांना दोन गणवेश देण्यासाठी प्रतिविद्यार्थी ६०० रुपये मिळणार आहेत. यासाठी जि. प. च्या शिक्षण विभागाला ८ कोटी ६४ लाख १० हजार ८०० रुपयांचा निधी मिळाला असून, या निधीच्या वाटपासाठीची मार्गदर्शक तत्त्वे (गाईडलाईन) प्राप्त झाली आहेत. यामुळे १५ दिवसांनंतर हा निधी वाटपाला सुरुवात होणार आहे.

समग्र शिक्षा अभियानांतर्गत लाभार्थ्यांना मागील वर्षापर्यंत दोन गणवेशासाठी प्रत्येकी ४०० रुपयांचा निधी देण्यात येत होता. मात्र त्यात यावर्षी २०० रुपयांची वाढ करून ६०० रुपये एवढी रक्कम करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या सूचनेनुसार शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप, निधी देण्याचे धोरण होते. यावर्षी सर्व शिक्षा अभियान, राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान आणि शिक्षकांचे शिक्षण या केंद्र सरकार पुरस्कृत योजनांचे एकत्रीकरण करून  एकच समग्र शिक्षा अभियान ही योजना कार्यान्वित केली आहे.

महाराष्ट्रात या योजनांची अंमलबजावणी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या राज्य प्रकल्प संचालकांमार्फत केली जाते. मात्र, नियोजित वेळेत योजना राबविण्याविषयीची मार्गदर्शक तत्त्वे (गाईडलाईन) मिळाली नसल्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी गणवेशांचे वाटप करण्यात आले नव्हते. शाळा सुरू झाल्यानंतर दहा दिवसांनी गणवेशासंदर्भातील गाईडलाईन प्राप्त झाल्या आहेत. तसेच यासाठी लागणारा निधीही उपलब्ध झाला असल्याची माहिती औरंगाबाद जि. प. च्या समग्र शिक्षा अभियानातून देण्यात आली. विद्यार्थ्यांच्या पालकांनी दोन गणवेशांची खरेदी करून त्याच्या पावत्या मुख्याध्यापकांकडे जमा केल्यानंतर ६०० रुपयांचा निधी संबंधित विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केला जाणार आहे.

निधी वर्ग करण्याचा गोंधळ कमी होणार
मागील वर्षी गणवेशाची रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्याचे आदेश दिले होते. मात्र दुर्गम भाग, खेड्यातील विद्यार्थ्यांची बँक खाती नसल्यामुळे अनेक लाभार्थ्यांना या  योजनेपासून वंचित राहावे लागले. मात्र यावर्षी राज्य प्रकल्प संचालकांनी दिलेल्या गाईडलाईनमध्येच १४ डिसेंबर २०१७ च्या पत्रान्वये प्रत्यक्ष लाभार्थी व त्यांची आई यांच्या संयुक्त बँक खात्याचा आग्रह न धरता, लाभार्थी विद्यार्थी किंवा आई किंवा वडील यांच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा करण्याचे आदेश दिले आहेत. 

या आहेत गाईडलाईन
- सरकारच्या डीबीटी धोरणानुसार योजनेची अंमलबजावणी.
- दोन गणवेश संच खरेदी करून पावत्या मुख्याध्यापकांकडे सुपूर्द करणे बंधनकारक.
- पैसे बँक खात्यात वर्ग करण्याची कार्यवाही शाळा करणार.
- विद्यार्थी किंवा आई, वडिलांच्या बँक खात्यात पैसे वर्ग करण्याची मुभा.
- गणवेशाचा रंग, प्रकार शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीने ठरवावेत.  

१०० टक्के पाठ्यपुस्तके वितरणाचा दावा
जिल्ह्यातील जि. प.च्या २,५८१ शाळांमधील शालेय पाठ्यपुस्तकांचे १०० टक्के वाटप केले असल्याचा दावा जि. प. च्या प्राथमिक शिक्षणाधिकारी कार्यालयाने केला आहे. या शाळांमध्ये ३ लाख ५० हजार ३९४ विद्यार्थ्यांना १८ लाख ७५ हजार १३ पाठ्यपुस्तके वितरित केल्याचेही या कार्यालयाने स्पष्ट केले.

Web Title: Aurangabad Zilla Parishad's one lakh 44 thousand students will get two uniforms

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.