अबब... औरंगाबादकर वर्षाला खातात १६ टन माती!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2018 05:50 AM2018-07-12T05:50:55+5:302018-07-12T05:51:00+5:30
कुणी चुकीचे वागल्यास ‘माती खाल्ली होती का’ असे म्हटले जाते. मात्र, औरंगाबादमध्ये काही लोक असे आहेत की, ते ‘होय आम्ही माती खातो...’ असेच म्हणताहेत.
- प्रशांत तेलवाडकर
औरंगाबाद - कुणी चुकीचे वागल्यास ‘माती खाल्ली होती का’ असे म्हटले जाते. मात्र, औरंगाबादमध्ये काही लोक असे आहेत की, ते ‘होय आम्ही माती खातो...’ असेच म्हणताहेत. माती खाण्याची अनेकांना सवय लागली आहे. त्यातही महिला, तरुणी अग्रेसर आहेत. माती खाणाऱ्यांचे प्रमाण एवढे आहे की, शहरात चक्क गुजरातहून ट्रक भरून म्हणजे १६ टन भाजक्या मातीचे खडे आले आहेत.
भावनगर येथून भाजक्या मातीची पोती घेऊन आलेला ट्रक शहरातील नारेगाव परिसरात उतरविण्यात आला. बोलणाºयाची माती विकली जाते, असे म्हणतात; पण इथे माती विकली तर जात आहेच, शिवाय ती चवीने खाल्लीही जात आहे. औरंगाबादच्या एका होलसेल विक्रेत्याने सांगितले की, खाण्यासाठी शहरात दरवर्षी १६ टन माती लागते. ही मुलतानी माती असते. फिकट पिवळी मुलतानी माती सौंदर्यप्रसाधन म्हणून वापरली जाते, तर राखाडी रंगाची भाजकी मुलतानी माती खाण्यासाठी वापरली जाते. पाकिस्तानच्या पंजाबमधील मुलतान शहराच्या परिसरात ती मिळते. मुलतानहून गुजरातच्या भावनगर येथे ही माती आणली जाते. या मातीला खड्यांचा आकार देऊन ती भाजली जाते व तेथून सर्व राज्यात ती विक्रीसाठी पाठविली जाते. ही भाजकी माती हलक्या-भारी प्रतीनुसार ५०० ते १ हजार रुपयांपर्यंत एक पोते (५० किलो) या दराने विकली जाते. किरकोळ विक्रीत २० ते ४० रुपये किलोने मातीचे खडे मिळतात.
माझ्या एका दुकानातून दररोज ५ ते १० किलोपर्यंत भाजकी माती विकली जाते. काही जण दररोज साधारणत: २० ग्रॅम ते ५० ग्रॅमपर्यंत मातीचे खडे खातात, असे शेख खलील यांनी सांगितले. काही तरुणी व पुरुषांनाही माती खाण्याचे व्यसन लागले आहे. दर आठवड्याला ते नियमितपणे मातीचे खडे विकत घेऊन जातात, असे विक्रेत्यांनी सांगितले.
‘पिका’ मानसिक आजाराने ग्रस्त
माती खाणारे ‘पिका’ या मानसिक आजाराने ग्रासलेले असतात. जे अन्नघटक नाहीत, ते खाण्याची इच्छा होते. पिका हा लॅटिन शब्द आहे. ‘पिका’च्या बहुतेक केसेस पछाडणारी व्याधीच्या (आॅब्सेसिव्ह कम्पलिव्ह डिसआॅर्डर) श्रेणीत मोडतात. काही महिला, मुली सातत्याने माती खात असतात.
- डॉ. सविता पानट, स्त्रीरोगतज्ज्ञ
खाण्यात तारतम्य असावे
निसर्गाचे प्रत्येक घटकात औषधी गुण असतात. मातीतही औषधी गुण आहेत. पण आता कॅल्शियमच्या गोळ्या आल्या आहेत. शरिरातील लोहाचे कमी प्रमाण त्याने भरून निघते. आजही गेरूचा वापर आयुर्वेदात औषधी म्हणून केला जातो. मात्र, कोणतीही गोष्ट खाताना तारतम्य बाळगले पाहिजे. यावर योग्य शास्त्रोक्त आयुर्वेदिक उपचार आहेत.
- डॉ. संतोष नेवपूरकर,
आयुर्वेद चिकित्सक
लोह कमतरतामुळे...
आर्यन, फॉलिक अॅसिडच्या कमतरतेने महिलांना माती खाण्याची सवय लागते. शहरातील ६० ते ६२ तर ग्रामीण भागातील ८० टक्के महिलांना अॅनिमिया असतो. आर्यनच्या कमतरतेमुळे ३० टक्के महिला माती खातात. माती खाल्ल्याने गरोदर महिलांची अपूर्णकालीन प्रसूती होणे, बाळाचे वजन कमी भरणे, तसेच प्रसूती काळात हृदयदाब वाढणे, अशा तक्रारी येतात. पूर्वी असे रुग्ण मोठ्या संख्येने येत होते. जनजागृतीमुळे प्रमाण कमी झाले आहे.
- श्रीनिवास गडप्पा, विभागप्रमुख,
स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र, शासकीय रूग्णालय