औरंगाबादकरांचा पुन्हा घडवला इतिहास; एकाच दिवशी शहरात १०१ इलेक्ट्रिक कार दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2022 01:27 PM2022-03-15T13:27:46+5:302022-03-15T13:28:42+5:30
समारंभपूर्वक वितरण : यात २५ महिला डॉक्टर्स, उद्योजक, प्राध्यापकांचा समावेश
औरंगाबाद : नोंदणी केलेल्या २५० पैकी सोमवारी एकाच दिवशी १०१ इलेक्ट्रिक कार शहरात दाखल झाल्या. एका पंचतारांकित हॉटेलमध्ये रात्री या कारचे समारंभपूर्वक वितरण करण्यात आले. विशेष म्हणजे, यामध्ये २५ महिला डॉक्टर्स, उद्योजक, प्राध्यापकांचा समावेश आहे. शहराला ईव्ही मॅपवर नेण्याच्या दिशेने पडलेले हे पाऊल म्हणावे लागेल. दोन महिन्यांपूर्वी मराठवाडा ऑटो क्लस्टरने औरंगाबाद मिशन ग्रीन मोबिलिटी (एएमजीएम) या अभियानाची सुरुवात केली होती. या अभियानांतर्गत शहरातील उद्योजक, वकील, डॉक्टर, प्राध्यापक व काही नागरिकांनी २५० इलेक्ट्रिक कारची बुकिंग केली होती. यापैकी पहिल्या टप्प्यात सोमवारी १०१ कारचे समारंभपूर्वक वितरण करण्यात आले. औरंगाबाद शहर हे राज्यातील आघाडीचे औद्योगिक उत्पादन आणि ऑटोमोबाईल हब म्हणून नावारूपास आलेले आहे.
यावेळी बोलताना टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेईकल्स आणि टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक शैलेश चंद्र म्हणाले, ‘एएमजीएम’चे सदस्य केवळ वैयक्तिक योगदानकर्ता म्हणूनच नव्हे, तर औरंगाबाद शहर हरित, स्वच्छ आणि प्रदूषण विरहित करण्यासाठी पुढाकार घेत आहेत. या अभियानाचा इतर राज्यांसाठीही एक आदर्श निर्माण होईल.
उल्हास गवळी म्हणाले, औरंगाबाद शहराला मागील काही वर्षांपूर्वी राष्ट्रीय हरित लवादाने वाढत्या प्रदूषणामुळे काही निर्बंध लावले होते. त्यावर तोडगा काढण्यासाठी सरकारने उपाययोजना करण्यासोबतच आपणही पुढाकार घ्यावा, असा विचार करून हे अभियान सुरू झाले. प्रदूषण न करणाऱ्या इलेक्ट्रिक गाड्यांबद्दल प्रचार आणि प्रसार करण्याच्या उद्देशाने दोन महिन्यांपूर्वी या अभियानाची सुरुवात करण्यात आली. त्यास कमी वेळेत औरंगाबाद शहरवासीयांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला. पहिल्या टप्प्यातील कारनंतर आता इलेक्ट्रिक तीन चाकी, दुचाकी, बस औरंगाबादच्या रस्त्यावर आणण्याचा आमचा प्रयत्न असेल.
कार्यक्रमास मनपा प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय आणि पोलीस आयुक्त निखिल गुप्ता उपस्थित होते. मनपा प्रशासक पाण्डेय म्हणाले, स्मार्टसिटीवतीने ईव्ही पॉलिसीची अंमलबजावणी करण्यात येत असून लवकर शहरबसमध्ये नवीन ६० ईव्ही बस दाखल होतील. कर्मचाऱ्यांसाठी ईव्ही कार आणि शहरात २००हून अधिक चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार आहेत.
कार्यक्रमाचे प्रस्तावना राजलक्ष्मी लोढा आणि आभार प्रदर्शन सतीश लोढा यांनी केले. या वेळी ‘सीएमआयए’चे अध्यक्ष शिवप्रसाद जाजू, ‘सीआयआय’चे अध्यक्ष प्रसाद कोकीळ, उद्योजक राम भोगले, मानसिंग पवार, ऋषी बागला, मुनिष शर्मा, गिरधर संगेरिया, आशिष गर्दे, प्रशांत देशपांडे, सचिन मुळे, अभय हंचनाळ, मनीष धूत यांची प्रमुख उपस्थिती होती.