औरंगाबादकरांचा पुन्हा विक्रम; मर्सिडीजनंतर आता एकाच वेळी २५० इलेक्ट्रिक वाहनांचे डील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2022 06:01 PM2022-01-27T18:01:46+5:302022-01-27T18:04:14+5:30
केंद्र सरकारच्या प्रस्तावित व राज्य सरकारकडून संचालित इलेक्ट्रिक वाहनांना सबसिडी देण्याची योजना मार्चपर्यंत वाढविल्यानंतर शहरात २५० वाहने एकाच वेळी खरेदी करण्याच्या कल्पनेने उचल खाल्ली.
- अमिताभ श्रीवास्तव
औरंगाबाद : एकाच वेळी दीडशे मर्सिडीज खरेदी करण्याचा विक्रम केल्यानंतर ऐतिहासिक शहर आता एकाच वेळी २५० इलेक्ट्रिक वाहने खरेदी करण्याचा विक्रम करणार आहे. याबाबतच्या डीलला अंतिम रूप देण्यात आले असून, या महिन्याच्या अखेरपासून मार्चपर्यंत सर्व वाहने ग्राहकांना सुपुर्द करण्यात येणार आहेत.
उद्योग जगतातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारच्या प्रस्तावित व राज्य सरकारकडून संचालित इलेक्ट्रिक वाहनांना सबसिडी देण्याची योजना मार्चपर्यंत वाढविल्यानंतर शहरात २५० वाहने एकाच वेळी खरेदी करण्याच्या कल्पनेने उचल खाल्ली. याबाबत वाहनांची उपलब्धता, ही एक समस्या होती. ती आता अदालत रोडवरील शहरातील एका मोठ्या वाहन डीलरने दूर केली आहे. शानदार बुकिंग पाहून महाराष्ट्रात इलेक्ट्रिक वाहनांचे उत्पादन करणाऱ्या कंपनीकडून तीन महिन्यांत वाहने उपलब्ध करण्यास तयार झाले आहे. याशिवाय गरज पडल्यास आर्थिक साह्यासाठी काही बँकांशीही चर्चा सुरू आहे. यात एका मोठ्या बँकेने कर्ज देण्यासाठी होकारही दिलेला आहे.
वेगळा व गोपनीय प्रयत्न
दीडशे मर्सिडीज खरेदी केल्यानंतर औरंगाबादेत २५० इलेक्ट्रिक वाहने एकाच वेळी खरेदी करण्यासाठी वेगळे व गोपनीय प्रयत्न करण्यात येत आहेत. याचा उद्देश संपूर्ण देशाला पर्यावरण संरक्षणाचा संदेश देणे, हा आहे. दुसऱ्या कोणत्या शहराने याची कॉपी करू नये, यासाठी एवढ्या मोठ्या डीलला गुप्त ठेवले जात आहे.
रॅली काढण्याची योजना
मोठ्या संख्येने इलेक्ट्रिक वाहनांचे शहरात आगमन होत असल्यामुळे सामाजिक व पर्यावरणाशी संबंधित लोकही उत्साहित झाले आहेत. एप्रिलमध्ये सर्व वाहनांना एकत्रित करून शहरात एक रॅली काढण्याचीही तयारी सुरू करण्यात आली आहे. यामुळे इलेक्ट्रिक वाहनांच्या आवश्यकतेबद्दल सर्वसामान्य लोकांमध्ये जागरूकता वाढणार आहे.
मागणी अधिक; परंतु उपलब्धता कमी
केंद्र व राज्य सरकारचे प्रयत्न व काही क्षेत्रांतील अनिवार्यतेमुळे इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढली आहे. परंतु निर्माते ही मागणी पूर्ण करण्यास समर्थ नाहीत. अनेक कंपन्यांत सहा ते सात महिन्यांची प्रतीक्षा यादी आहे. काही कंपन्यांनी बाजाराची मागणी लक्षात घेऊन पावले उचलली असून, त्याचे परिणामही दिसू लागले आहेत.
डीलबाबत उत्सुकता वाढली
एकीकडे २५० इलेक्ट्रिक वाहनांच्या नव्या डीलच्या चर्चेने जोर धरला आहे तर दुसरीकडे त्याच संबंधातील प्रयत्नात उद्योग जगतातील पदाधिकारी, बडे ऑटो डिलर्सशी विचारपूस करण्याचा सिलसिला सुरू आहे. उपलब्धता व मोहिमेच्या मर्यादेमुळे ग्राहकांचे प्रयत्न लवकरच थांबू शकतात.