औरंगाबादकरांचे शिर्डीहून मुंबई, दिल्लीचा हवाई प्रवास; नव्या विमान सेवेची प्रतीक्षाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2019 08:12 PM2019-05-15T20:12:50+5:302019-05-15T20:20:09+5:30
जेट एअरवेजचे मुंबई- औरंगाबाद- मुंबई विमान महिनाभरापासून बंद आहे.
औरंगाबाद : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण घेणारे जेट एअरवेजचे मुंबई- औरंगाबाद- मुंबई विमान महिनाभरापासून बंद आहे. परिणामी, आता थेट सायंकाळीच एअर इंडिया आणि ट्रू जेटच्या विमानांचे उड्डाण होत आहे. परिणामी, सकाळी मुंबई आणि दिल्लीला विमानाने जाऊ इच्छिणारे प्रवासी शिर्डी विमानतळाकडे वळत असल्याने औरंगाबादेत चिंता व्यक्त होत आहे.
आर्थिक संकटात सापडलेल्या जेट एअरवेजने आपली विमान वाहतूक तात्पुरत्या काळासाठी बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे जेट एअरवेजची औरंगाबादहून सुरूअसलेली सकाळ आणि सायंकाळची मुंबई- औरंगाबाद- मुंबई विमानसेवा बंद पडली आहे. आजघडीला हैदराबाद- तिरुपती, मुंबई आणि दिल्ली या शहरांसाठी विमानसेवा सुरू आहे. एअर इंडिया, ट्रू जेट या दोन कंपन्यांकडून ही विमानसेवा दिली जात आहे. या कंपन्यांच्या विमानांचे उड्डाण हे दुपारनंतर होते. त्यामुळे सकाळच्या वेळेत आणि तातडीने मुंबई आणि दिल्लीला जाऊ इच्छिणारे प्रवासी अशा परिस्थितीत शिर्डी विमानतळाचा पर्याय अनेक जण निवडत आहेत. औरंगाबादेहून शिर्डी गाठून दिल्ली, मुंबईला जाण्यास प्राधान्य दिले जात आहे. त्याप्रमाणेच या दोन शहरांतून औरंगाबादला येणारे प्रवासीही शिर्डीचा पर्याय निवडत आहेत.
एकीकडे ही परिस्थिती आहे, तर दुसरीकडे जेट एअरवेजचे उड्डाण होत असताना एअर इंडियाचे मुंबई- औरंगाबाद- दिल्ली, दिल्ली- औरंगाबाद- मुंबई मार्गावर १२२ प्रवासी क्षमतेचे विमान होते. जेट एअरवेज बंद झाल्यानंतर प्रवाशांची मागणी वाढत असल्याने १२२ ऐवजी १६२ आसनक्षमता असलेले विमानाचे उड्डाण होत असल्याचे एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
नव्या विमानसेवेसाठी प्रयत्न
नव्या विमानसेवेसाठी पाठपुरावा आणि प्रयत्न केला जात आहे. या प्रयत्नांना यश येऊन आगामी काही दिवसांत नवीन विमानसेवा सुरू होईल, असे चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे संचालक डी.जी. साळवे यांनी सांगितले.
वाढते प्रमाण
शिर्डीहून दिल्लीला जाण्याचे प्रमाण वाढत आहे. मुंबईला जाण्यासाठीही शिर्डीकडे वळत आहेत; परंतु त्याचे प्रमाण अधिक नाही. मुंबईला जाण्यासाठी जनशताब्दी एक्स्पे्रसचा पर्याय वाढत आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर नव्या विमानसेवेसंदर्भात काही हालचाली होतील, असे औरंगाबाद टुरिझम प्रमोटर्स गिल्डचे अध्यक्ष जसवंतसिंग म्हणाले.