औरंगाबादकरांची छोट्या पंढरपुरात गर्दी; विविध भागातून निघाल्या पायी दिंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2018 12:20 PM2018-07-23T12:20:48+5:302018-07-23T12:32:12+5:30
शहरात आज पहाटेपासूनच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. याशिवाय छोट्या पंढरपूरला जाण्यासाठी अनेक भागांतून पायी दिंडीही निघाल्या आहेत.
औरंगाबाद : आषाढी एकादशीनिमित्त शहरातील विविध भागांतील विठ्ठल-रुक्मिणीची मंदिरे सजविण्यात आली आहेत. बहुतांश मंदिरांना रंगरंगोटी करण्यात आली आहे. यानिमित्ताने आज पहाटेपासूनच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. याशिवाय छोट्या पंढरपूरला जाण्यासाठी अनेक भागांतून पायी दिंडीही निघाल्या आहेत.
शहरातून तसेच सिडको-हडको, मुकुंदवाडी, चिकलठाणा, पुंडलिकनगर, शिवाजीनगर, जवाहर कॉलनी, सारा वैभव आदी भागांतून छोटा पंढरपूर (वाळूज) ला जाण्यासाठी पायी दिंडीला आज सकाळपासूनच सुरुवात झाली. बन्सीलालनगर येथील माहेश्वरी प्रभागतर्फे गिरिजामाता मंदिरापासून सकाळी ७ वाजता दिंडीला प्रारंभ झाला. याशिवाय बेगमपुरा, पदमपुरा, विद्यानगर आदी भागांतूनही जुन्या पारंपरिक दिंडी निघणार आहे. जालना रोड, अदालत रोड, छावणी ते छोटा पंढरपूर या रस्त्यावर काही ठिकाणी स्वयंसेवी संस्था, मित्रमंडळांच्या वतीने फराळाची व्यवस्था केली आहे.
विविध ठिकाणी महापूजेचे आयोजन
जुन्या व नवीन वसाहतींमध्ये अनेक ठिकाणी विठ्ठल-रुक्मिणीची मंदिरे आहेत. त्यापैकी एक जुने मंदिर औरंगपुऱ्यातील एकनाथ मंदिर होय. येथे विठ्ठल-रुक्मिणीचे मंदिर आहे. येथील विश्वस्त समितीचे अध्यक्ष अॅड. सदानंद देव यांच्या हस्ते पहाटे अभिषेक व पूजा करण्यात येणार आहे. सकाळी ७ वाजता मंदिरातून छोटा पंढरपूरकडे पायी दिंडी काढण्यात येणार आहे. ज्योतीनगरातील विठ्ठल-रुक्मिणीच्या मंदिरात दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सिडको एन-६ येथील विठ्ठल-रुक्मिणीच्या मंदिरात पहाटे ४ वाजता काकडारती व महापूजा होणार आहे. दुपारी महिला भजनी मंडळाचा कार्यक्रम होणार आहे. मयूर पार्क येथील विठ्ठल-रुक्मिणी व गणपती मंदिरातही महापूजा, अभिषेक करण्यात येणार आहे.