औरंगाबादकरांनो आरोग्य सांभाळा, ७ वर्षांनंतर जुलैने वाढविला ‘ताप’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:02 AM2021-07-09T04:02:01+5:302021-07-09T04:02:01+5:30
संतोष हिरेमठ औरंगाबाद : शहरात तब्बल ७ वर्षांनंतर जुलै महिन्यात रेकाॅर्ड ब्रेक तापमानाची नोंद झाली आहे. शहरवासीयांना गेल्या सहा ...
संतोष हिरेमठ
औरंगाबाद : शहरात तब्बल ७ वर्षांनंतर जुलै महिन्यात रेकाॅर्ड ब्रेक तापमानाची नोंद झाली आहे. शहरवासीयांना गेल्या सहा दिवसांपासून अगदी मे महिन्याप्रमाणे उकाड्याला सामोरे जावे लागत आहे. अशा तापदायक वातावरणामुळे आरोग्य बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आरोग्य जपण्याचा सल्ला डाॅक्टरांनी दिला आहे.
शहरात १ जुलै २०१४ मध्ये ३६.६ अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद झाली होती. त्यानंतर पुढील प्रत्येक वर्षी जुलै महिन्यात ३६ अंशापेक्षा कमी तापमान राहिले. परंतु तब्बल ७ वर्षांनंतर यंदा जुलै महिन्यात पुन्हा एकदा कमाल तापमानाचा पारा ३६ अंशावर गेला. शहरात ७ जुलै रोजी ३६.१ अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली. पावसाळा सुरू होऊन महिना उलटला, मात्र एक-दोन दिवस हजेरी लावून पाऊस गायब झाला आहे. अशा परिस्थितीत जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून पावसाअभावी तापमान वाढीला नागरिकांना समोरे जावे लागत आहे. ढगाळ वातावरणात उकाड्यामुळे घामाघूम होण्याची वेळ नागरिकांवर ओढवत आहे.
------
असा मोडला ‘जुलै’चा रेकाॅर्ड
वर्ष ----कमाल तापमान
२०१३--३२.०
२०१४-३६.६
२०१५- ३५.६
२०१६-३१.५
२०१७-३३.६
२०१८-३४.०
२०१९-३४.९
२०२०-३२.६
२०२१-३६.१
----
सरासरी तापमानात सहा अंशांची वाढ
जुलै महिन्यात यंदा सरासरी तापमानात सहा अंशांची वाढ झाली आहे. त्यामुळे ऐन पावसाळ्याच्या दिवसांत नागरिकांना उकाड्याला सामोरे जावे लागत आहे. मे महिन्याप्रमाणे जुलैमध्ये तापमानाची नोंद झाली आहे.
------
आगामी आठवडाभर पावसाचा अंदाज
मान्सून पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. त्यामुळे आगामी आठवडाभर पावसाचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे वातावरणात वाढलेला उकाडा कमी होईल, अशी अपेक्षा आहे.
------
आरोग्य सांभाळा
गेल्या चार दिवसांपासून उकाडा वाढला आहे. मुंबईप्रमाणे वातावरण जाणवत आहे. अशा परिस्थितीत डिहायड्रेशन होऊ शकते. त्यामुळे भरपूर पाणी प्यावे, सकस आहार घ्यावा. लहान मुलांची विशेष काळजी घ्यावी.
- डाॅ. पराग अंभोरे
------
मान्सून पुन्हा सक्रिय
५ जुलैपर्यंत मान्सून पूर्ण देशात पोहोचतो, परंतु सध्या राजस्थानच्या अलीकडेच मान्सून आहे. त्यामुळे उष्णतेची लाट निर्माण झाली आहे. आता पुन्हा एकदा मान्सून सक्रिय होत आहे. पुढचे १२ दिवस पावसाचे आहेत. त्यामुळे सध्या होणारी लाही-लाही शांत होईल.
- श्रीनिवास औंधकर, हवामानतज्ज्ञ