औरंगाबादकरांना मिळणार निर्यातक्षम केशर आंबे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:04 AM2021-05-01T04:04:11+5:302021-05-01T04:04:11+5:30
औरंगाबाद : आपल्या रंग, सुगंध आणि गोडीने खवय्यांच्या जिभेवर राज्य करणारा व मराठवाड्यातील केशर आंबा १५ मेनंतर मोठ्या प्रमाणात ...
औरंगाबाद : आपल्या रंग, सुगंध आणि गोडीने खवय्यांच्या जिभेवर राज्य करणारा व मराठवाड्यातील केशर आंबा १५ मेनंतर मोठ्या प्रमाणात बाजारात येणार आहे. विशेष, म्हणजे निर्यातक्षम आंब्याची चव यंदा शहरवासीयांना चाखण्यास मिळणार आहे.
मराठवाड्यात २० हजार हेक्टरवर केशर आंब्याचे क्षेत्र विस्तारले आहे. हापूस प्रमाणे केशर आंब्याची महाकेशर नावाने ब्रँडिंग करण्यासाठी महाकेशर आंबा बागायतदार संघ स्थापन करण्यात आला आहे. निर्यातीसाठी या संघाचे व निर्यातदारांच्या दोन बैठका झाल्या, पण निर्यातविषयी अजून निर्णय झाला नाही. यासंदर्भात संघाचे अध्यक्ष सुशील बलदवा म्हणाले की, अवकाळी पावसामुळे यंदा आंब्याचे उत्पादन ५० टक्क्यांनी घटले. त्यात लॉकडाऊन व विदेशात कोरोनामुळे आंबे खरेदी करतील की, नाकारतील ही शंका आहे. विदेशात आंबा नाकारल्यास मोठे नुकसान होईल. आणि तसेही विदेशाच्या बरोबरीने येथे चांगला भाव मिळत असल्याने बहुतांश बागायतदार स्थानिक बाजारात केशर आंबा विक्रीला प्राधान्य देतील. तसा मराठवाड्यातील केशर आंबा बाजारात येण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, १५ मेपासून खरा हंगाम सुरू होईल. निर्यातक्षम केशर आंबा १५० ते २०० रुपये किलो दरम्यान विकला जाईल. यामुळे निर्यातक्षम आंबा खवय्यांना खाण्यास मिळेल, असेही त्यांनी नमूद केले.
चौकट
बाजारात गुजरातचा केशर आंबा
सध्या हातगाड्यावर विक्री होणार केशर आंबा हा दोन दिवसांपासून गुजरातमधून आणला जात आहे. मराठवाड्यातील केशर म्हणून तो विकला जात आहे. मात्र, मराठवाड्यातील केशर मे महिन्यात बाजारात विक्रीला येतो. महिनाभरच केशरचा हंगाम असतो.