औरंगाबादची हवाई कनेक्टिव्हिटी वाढली; आता मुंबईमार्गे कोलकात्याला भेटणार विमानसेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2021 06:54 PM2021-01-05T18:54:22+5:302021-01-05T19:05:43+5:30
इंडिगोकडून सुरू असलेल्या मुंबई विमानसेवेच्या माध्यमातून ही नवीन हवाई कनेक्टिव्हिटी शहराला मिळणार आहे.
औरंगाबाद : औरंगाबादला ८ जानेवारीपासून मुंबईमार्गे कोलकात्याला हवाई कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. तेही अगदी कोणतेही विमान न बदलता. त्यामुळे एकप्रकारे औरंगाबाद आणि कोलकाता विमानसेवेने जोडले जाणार आहे.
इंडिगोकडून सुरू असलेल्या मुंबई विमानसेवेच्या माध्यमातून ही नवीन हवाई कनेक्टिव्हिटी शहराला मिळणार आहे. ८ जानेवारीपासून इंडिगोचे मुंबई विमान दररोज आणि सकाळच्या वेळेत उड्डाण घेणार आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सुविधेत भर पडणार आहे. या सुविधेपाठोपाठ मुंबईमार्गे आता शहरवासीयांना कोलकाता येथे जाता येईल. त्यासाठी विमान बदलण्याचीही गरज राहणार नसून, मुंबईला पोहोचल्यानंतर तासाभरात विमान कोलकातासाठी उड्डाण घेईल, असे उद्योजक सुनीत कोठारी यांनी सांगितले. शहरात कोलकाता येथून उद्योग, व्यवसाय, व्यापारानिमित्त स्थायिक झालेल्या नागरिकांची मोठी संख्या आहे. या विमान सुविधेचा प्रवाशांना फायदा होणार आहे.