निजामकाळात नवरदेवाला लागायची ‘हिमरू’चीच शेरवानी; आता गतवैभवाला लागली उतरती कळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2019 03:42 PM2019-06-06T15:42:22+5:302019-06-06T16:05:02+5:30

औरंगाबादची ऐतिहासिक कला कशीबशी आहे तग धरून 

Aurangabad's ancient 'Himaru' cloth art is critical in time lapse | निजामकाळात नवरदेवाला लागायची ‘हिमरू’चीच शेरवानी; आता गतवैभवाला लागली उतरती कळा

निजामकाळात नवरदेवाला लागायची ‘हिमरू’चीच शेरवानी; आता गतवैभवाला लागली उतरती कळा

googlenewsNext
ठळक मुद्दे‘हम’ म्हणजे ‘हमशकल’ आणि ‘रूह’ म्हणजे आत्मा असे या वस्त्राचे ‘हमरू’ शहरातील पर्यटन मंदावल्याचा फटकाही हिमरूवर झाला आहे

- रुचिका पालोदकर 

औरंगाबाद : निजामाच्या काळात अशी परिस्थिती होती की, नवरदेवाला फक्त हिमरू कपड्यापासून बनवलेली शेरवानीच लागायची. मानाची समजली जाणारी हिमरूची शेरवानी नसेल तर लग्नसमारंभ अपूर्ण वाटायचा. राजा-महाराजांकडून हिमरू शाल भेट स्वरूपात देश-विदेशातील पाहुण्यांना अगत्याने दिली जायची आणि त्यांनाही तो त्यांचा सन्मान वाटायचा. असा राजेशाही थाट उपभोगलेल्या हिमरू शालीच्या वैभवाला आता मात्र उतरती कळा लागली असून, विक्री खूप खालावली आहे.

हिमरू शालीचा इतिहास सांगताना इतिहास अभ्यासक रफत कुरेशी म्हणाले की, १४ व्या शतकात मोहम्मद बीन तुघलक याने आपली राजधानी दिल्ली येथून दौलताबादला आणली. तेव्हा त्याच्यासोबत हिमरूचे विणकाम करणारे काही कारागीर, उद्योगपती दौलताबादला आले. तेथे स्थायिक होऊन त्यांनी त्यांची कला त्याठिकाणी फुलविली. यानंतर औरंगजेब जेव्हा सुभेदार म्हणून दक्षिणेत आला, तेव्हा तो दौलताबादला न राहता औरंगाबादला राहू लागला. जेथे राजा राहायचा, तेथेच व्यापारी, उद्योजक, कारागीर राहायचे. म्हणून मग औरंगजेब पाठोपाठ हिमरूचे व्यापारी आणि उद्योगपतीही दौलताबादहून औरंगाबादेत आले आणि येथेच स्थायिक झाले आणि हिमरू औरंगाबादची म्हणून ओळखली जाऊ लागली. 

पूर्वी हिमरू या वस्त्रापासून पुरुषांसाठी झब्बा शिवला जायचा. यानंतर यामध्ये बदल झाला आणि महिला जाकीट शिवण्यासाठी या कपड्याचा उपयोग करू लागल्या. यानंतर निजामाच्या काळात तर नवरदेवाला शेरवानी शिवण्यासाठी हे एक मानाचे वस्त्र म्हणून वापरले जायचे. नंतर पुन्हा या वस्त्राचा उपयोग बदलला आणि घराचे पडदे, बेडसीट, सोफा कव्हर म्हणून हिमरू वापरले जाऊ लागले. स्वातंत्र्यानंतर काही वर्षे तर राष्ट्रपती भवन आणि दिल्ली येथील सरकारी निवासस्थानांसाठी पडदे, बेडसीट आणि सोफा कव्हर म्हणून फक्त हिमरूच वापरले जायचे. यामुळे हिमरू व्यवसायाला मोठ्या प्रमाणात मदत झाली.

याशिवाय कोणी सरकारी पाहुणा औरंगाबादला आलाच तर त्यालाही आवर्जून हिमरूचे उत्पादन करणारा कारखाना दाखविला जायचा. हा या व्यवसायाचा मोठा सन्मान होता; पण हळूहळू असे पाहुणे येणे बंद झाले आणि हिमरूची खरेदीही थंडावली.
परदेशी पाहुण्यांना हिमरूचे आकर्षण असायचे; पण हिमरू कपडा एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांना त्यांच्या देशात घेऊन जाणे शक्य व्हायचे नाही. यावर पर्याय म्हणून अब्दुल हमीद कुरेशी यांनी हिमरू वस्त्राची शाल बनविली आणि मग हिमरू शाल स्वरूपात ओळखली जाऊ लागली. सध्या हिमरू ही शाल लहान आकाराच्या स्वरूपात सुद्धा उपलब्ध आहे. 

पर्यटन कमी झाल्याचा फटका
एकंदरीतच औरंगाबाद शहरात येणाऱ्या पर्यटकांची संख्या खूप कमी झाली आहे. मुंबई, जयपूर, उदयपूर या ठिकाणच्या पर्यटकांच्या तुलनेत औरंगाबादेतील पर्यटकांची आकडेवारी अत्यल्प आहे. यातही निवडक परदेशी पर्यटकच हिमरू शालीच्या खरेदीस प्राधान्य देतात. त्यामुळे शहरातील पर्यटन मंदावल्याचा फटकाही हिमरूवर झाला आहे, असे जाणकारांचे मत आहे.

कुरेशी परिवाराचे योगदान
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर बादशाही, राजघराणी संपुष्टात आली आणि या व्यवसायाला मिळणारी रॉयल्टी बंद झाली. उद्योग क्षेत्रातही क्रांती झाल्यामुळे अनेक कारखाने बंद झाले. कारागीर अन्य व्यवसायात गेले आणि हिमरू व्यवसायाचा ओघ हळूहळू कमी होत गेला. औरंगाबादचे भूषण असणारी ही प्राचीन कला जपण्याचा प्रयत्न औरंगाबादेतील कुरेशी परिवार आवर्जून करीत असून, यामुळेच दहा वर्षांपूर्वी पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते अहमद सईद कुरेशी यांचा विशेष सत्कार करण्यात आला होता. हाताने विणली गेली असेल तर तेच खरे हिमरू वस्त्र म्हणून ओळखले जाते; पण आता मात्र सर्रास मशीनवर विणकाम होत असून, या वस्त्राला खऱ्या हिमरूची सर येत नाही, असे रफत कुरेशी यांनी सांगितले.

हिमरूचा इतिहास
१४ व्या शतकाच्या आधीच्या काळात किमखाब नावाचे वस्त्र होते. ‘किमखाब’ म्हणजे असा उंची कपडा जो केवळ ‘ख्वाब’मध्येच मिळणे शक्य होईल. रेशमी वस्त्रावर सोन्या-चांदीचा जर वापरून ते विणले जायचे. हे वस्त्र अत्यंत महागडे असल्यामुळे केवळ राजे-महाराजे यांच्याकडूनच त्याचा वापर व्हायचा. अशाप्रकारचे वस्त्र थोड्या कमी किमतीत उपलब्ध करून देण्यासाठी रेशमी कपड्याऐवजी लोकर किंवा सुती कपडा तसेच सोने-चांदीऐवजी जर किंवा रेशमाने केलेले विणकाम अशा प्रकारचे वस्त्र तयार झाले. ‘किमखाब’ या वस्त्राशी मिळते-जुळते असल्यामुळे याला ‘हमरू’ असे नाव पडले. ‘हम’ म्हणजे ‘हमशकल’ आणि ‘रूह’ म्हणजे आत्मा असे या वस्त्राचे ‘हमरू’ असणारे मूळ नाव कालपरत्वे अपभ्रंश होत होत ‘हिमरू’ म्हणून ओळखले जाऊ लागले.
 

Web Title: Aurangabad's ancient 'Himaru' cloth art is critical in time lapse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.