औरंगाबादेतील ‘बसपोर्ट’चा चक्का जाम; दोन वर्षांपूर्वी झाली होती घोषणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2018 05:26 PM2018-04-13T17:26:14+5:302018-04-13T17:30:32+5:30
एअरपोर्टच्या धर्तीवर औरंगाबादेतील मध्यवर्ती बसस्थानकाच्या जागी अद्ययावत बसपोर्ट उभारण्याची दोन वर्षांपूर्वी घोषणा करण्यात आली; परंतु निविदा प्रक्रियेला कंत्राटदारांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने बसपोर्ट उभारणीचा चक्का जाम झाला आहे.
औरंगाबाद : एअरपोर्टच्या धर्तीवर औरंगाबादेतील मध्यवर्ती बसस्थानकाच्या जागी अद्ययावत बसपोर्ट उभारण्याची दोन वर्षांपूर्वी घोषणा करण्यात आली; परंतु निविदा प्रक्रियेला कंत्राटदारांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने बसपोर्ट उभारणीचा चक्का जाम झाला आहे.
एअरपोर्टच्या धर्तीवर बसपोर्ट सुरू करण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी घेतला. जानेवारी २०१६ मध्ये राज्यात औरंगाबादसह इतर काही शहरांमध्ये बसपोर्ट उभारण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले. ‘डिझाईन-बिल्ड-फायनान्स-ट्रान्स्फर-लीज’ या तत्त्वावर बसपोर्ट बांधण्यात येणार आहे. बसपोर्ट जाहीर केल्याच्या वर्षभरानंतर म्हणजे जानेवारी २०१७ मध्ये एस. टी. महामंडळातर्फे औरंगाबादसह राज्यातील ९ शहरांत उभारण्यात येणाऱ्या बसपोर्टसाठी निविदा प्रक्रिया जाहीर करण्यात आली; परंतु निविदा प्रक्रिया दोन वर्र्षे उलटूनही काही केल्या पूर्ण होत नाही. आंतरराष्ट्रीय दर्जाचा विचार करून सुविधा उभारण्यात येणार आहे; परंतु त्यासाठी कोणी कंत्राटदार पुढे येत नसल्याचे दिसते. त्यामुळे ई-निविदेचा कालावधी वाढविण्याशिवाय कोणताही पर्याय उरत नाही. परिणामी निविदा प्रक्रिया सुरूच आहे.
मध्यवर्ती बसस्थानकाच्या जागी बसपोर्ट उभारण्यासाठी नुसती कागदोपत्री प्रक्रिया सुरू असल्याने गेल्या अडीच वर्षांपासून बसस्थानकाच्या इमारतीच्या देखभाल-दुरुस्तीकडे लक्ष दिले जात नाही. त्यामुळे बसस्थानकाची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत आहे. बसस्थानकाच्या छताचे प्लास्टर उखडले असून, फलाटावरील फरशा, स्वच्छतागृह, अंतर्गत रस्ता आदींची दुरवस्था झालेली आहे. पावसाळा नसतानाही टाक्यांच्या गळतीने छताबरोबर खांब आणि भिंतीमध्ये पाणी झिरपण्याचे प्रकार होत आहेत.
उभारणीला किती वर्षे?
एसटी महामंडळाच्या प्रवाशांना लक्झरियस सेवा पुरविणे हा बसपोर्ट उभारणीमागील उद्देश आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष बसपोर्ट उभारणीलाही मोठा कालावधी जाणार आहे. बसपोर्टमध्ये प्लॅटफॉर्म, सुसज्ज प्रतीक्षालय, पुरुष व महिलांसाठी स्वच्छतागृह, चालक-वाहकांसाठी विश्रांतीगृह व स्वच्छतागृह, एटीएम, औषधालय, रिटेल शॉप, फूड कोर्ट, फूड काऊंटर, प्रशासकीय कार्यालय, व्हीआयपी रूम, कॉन्फरन्स रूम आदी सुविधा राहतील; परंतु दोन वर्षे होऊनही निविदा प्रक्रिया पूर्ण होत नसल्याने बसपोर्टची उभारणी होऊन या सुविधा कधी मिळणार,असा सवाल प्रवाशांकडून उपस्थित होत आहे.
कोणीतरी पुढे आले पाहिजे
बसपोर्टची निविदा काढलेली आहे. सर्वांसाठी ही निविदा आहे. उभारणीला उशीर होत असल्याचा काहीही संबंध नाही. बसपोर्ट उभारणीसाठी कोणीतरी पुढे आले पाहिजे, असे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष आणि परिवहनमंत्री दिवाकर रावते म्हणाले.