औरंगाबादेत ‘देश की बेटी बचाव’चा तरुणाईचा नारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 12:12 AM2018-04-19T00:12:25+5:302018-04-19T00:14:41+5:30
जम्मू-काश्मीर येथील कठुआ, उत्तर प्रदेशमधील उन्नाव, गुजरातमधील सुरत येथे झालेल्या मुलींवर झालेल्या अत्याचारांच्या घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, या मागणीसाठी पीईएस अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी बुधवारी विभागीय आयुक्तालयावर मोर्चा काढला.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : जम्मू-काश्मीर येथील कठुआ, उत्तर प्रदेशमधील उन्नाव, गुजरातमधील सुरत येथे झालेल्या मुलींवर झालेल्या अत्याचारांच्या घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, या मागणीसाठी पीईएस अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी बुधवारी विभागीय आयुक्तालयावर मोर्चा काढला. विद्यार्थ्यांनी विभागीय आयुक्तांमार्फ त राष्ट्रपतींना निवेदन दिले.
महिला आणि मुलींवरील अत्याचाराच्या विरोधात महाविद्यालयाचे विद्यार्थी बुधवारी एकत्र आले. महाविद्यालयापासून मोर्चाला सुरुवात झाली. टाऊन हॉल, आमखास मैदान मार्गे मोर्चा विभागीय आयुक्त कार्यालयावर गेला. मोर्चामध्ये विद्यार्थी विद्यार्थीनींनी महिलांवरील अत्याचाराच्या विरोधातील फलक घेतले होते.
‘बलात्काऱ्यांना फाशी द्या’, ‘देश की बेटी बचाव’, ‘वुई आर बॉर्न टू बी लाईव्ह, नॉट टू रेप’, ‘आय एम बेटी आॅफ नेशन, आय एम अनसेफ’, ‘ आता कोणाचा नंबर; माझा की तुमचा’ असा मजकूर लिहिलेले हे फलक होते. देशातील बलात्कारांच्या घटनांमुळे विद्यार्थ्यांमध्ये संतापाचे वातावरण दिसत होते.
विभागीय आयुक्त कार्यालयाच्या समोर मोर्चाचा समारोप झाला. मोर्चाद्वारे विभागीय आयुक्तांना देण्यात आलेल्या निवेदनात विविध मागण्या करण्यात आल्या. शासकीय यंत्रणा या प्रकरणात कारवाई करण्यात असक्षम ठरत आहेत.
या घटनांमुळे मुलींमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे, अशा प्रकारचे अमानवीय कृत्य करणाºयांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे. सदरील प्रकरणे जलदगती न्यायालयात चालविण्यात यावीत, ९० दिवसांत दोषींवर कारवाई व्हावी. त्यांना मृत्युदंडच दिला जावा.
कठुआ येथील बलात्काराचे प्रकरण दिल्ली हायकोर्टात चालविण्यात यावे. साक्षीदार, कुटुंब, वकिलांना संरक्षण देण्यात यावे, असे डॉ. ए. पी. वाडेकर, डॉ. आर. एम. सावंत, प्रा. शेख जहूर आदींनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.