औरंगाबादच्या डिझायनरचा दिल्लीत डंका; वातानुकूलित बसथांबे उभारण्यासाठी डिझाईनची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2018 01:13 PM2018-01-13T13:13:35+5:302018-01-13T13:17:49+5:30
दिल्ली सरकारने शहरात १५६ वातानुकूलित बसथांबे उभारण्यासाठी निविदा मागवल्या होत्या. ज्या कंपनीला या कामाच्या निविदा मिळाल्या, त्या कंपनीने वातानुकूलित बसथांबा डिझाईनची स्पर्धा आयोजित केली. यामध्ये औरंगाबादचे डिझायनर राजन प्रधान यांनी सहभाग नोंदवला. त्यांनी बनविलेल्या डिझाईनला या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाल्यामुळे आगामी दोन महिन्यांत दिल्लीत या डिझाईनचेच बसथांबे उभारण्यात येणार आहेत.
औरंगाबाद : दिल्ली सरकारने शहरात १५६ वातानुकूलित बसथांबे उभारण्यासाठी निविदा मागवल्या होत्या. ज्या कंपनीला या कामाच्या निविदा मिळाल्या, त्या कंपनीने वातानुकूलित बसथांबा डिझाईनची स्पर्धा आयोजित केली. यामध्ये औरंगाबादचे डिझायनर राजन प्रधान यांनी सहभाग नोंदवला. त्यांनी बनविलेल्या डिझाईनला या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाल्यामुळे आगामी दोन महिन्यांत दिल्लीत या डिझाईनचेच बसथांबे उभारण्यात येणार आहेत.
दिल्लीतील नगर निगमने शहरात विविध ठिकाणी वातानुकूलित बसथांबे उभारण्याची योजना जाहीर केली. या योजनेंतर्गत १५६ ठिकाणी प्री-असेम्बल्ड प्रकारचे बसथांबे उभारले जातील. बसथांबे उभारणीचे ज्या कंपनीला कॉन्ट्रॅक्ट मिळाले, त्यांनी देशभरातून विविध डिझायनरची स्पर्धा आयोजित केली. यामध्ये आयआयटीसह इतर नामांकित संस्थांमधील ५०० हून अधिक डिझायनर्सने सहभाग नोंदवला. औरंगाबादचे डिझायनर राजन प्रधान यांनीही यात सहभाग घेतला. त्यांनी सादर केलेल्या डिझाईनला या स्पर्धेत प्रथम पारितोषिक मिळाले आहे. ज्या डिझाईनला प्रथम क्रमांक मिळाला, तेच डिझाईन वातानुकूलित बसथांबे बनविण्यासाठी वापरण्यात येणार आहे. यानुसार व्यावहारिक आणि आर्थिकदृष्ट्या अतिशय लाभदायक असे डिझाईन दिल्लीतील बसथांबे बनविण्यासाठी वापरले जाणार असल्याचे राजन प्रधान यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
कसे आहे डिझाईन
वातानुकूलित बसथांब्यांचे बनविलेले डिझाईन व्यावहारिक आणि आर्थिकदृष्ट्या लाभदायक आहे. एकाच जागी असेम्बल करून बसथांबा कुठेही नेऊन स्थापित करता येऊ शकतो. संमिश्र साहित्य ते मेटल फ्रेमवर्कपासून बसथांबा बनवला जाणार आहे. या बसथांब्यावर मुबलक ब्रँडिंगची सोय, प्रकाश योजना, एर्गोनॉमिक्स असणार आहे. याशिवाय अत्यंत कमी खर्चात आणि पोर्टेबिलिटीच्या गुणधर्मामुळे या डिझाईनला प्राधान्य मिळाल्याचे राजन प्रधान यांनी सांगितले.