कठोर मेहनतीच्या बळावर औरंगाबादच्या शेतकऱ्याची डाळिंबे थेट युरोपात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2018 12:51 PM2018-12-15T12:51:08+5:302018-12-15T12:51:12+5:30

यशकथा : दर्जा तसेच इतर सर्व मानके पूर्ण केल्याने या शेतकऱ्याची डाळिंबे थेट सातासमुद्रापार युरोपात विक्रीला गेली आहेत.

Aurangabad's farmer pomegranates directly into Europe market | कठोर मेहनतीच्या बळावर औरंगाबादच्या शेतकऱ्याची डाळिंबे थेट युरोपात

कठोर मेहनतीच्या बळावर औरंगाबादच्या शेतकऱ्याची डाळिंबे थेट युरोपात

googlenewsNext

- जितेंद्र डेरे (जि. औरंगाबाद) 

लाडसावंगी, जिल्हा औरंगाबाद येथील रोहिदास रामदास कदम या शेतकऱ्याने पाण्याचे व्यवस्थापन, योग्य नियोजन व कठोर मेहनतीच्या बळावर डाळिंब उत्पादनात यशस्वी झेप घेतली आहे. दर्जा तसेच इतर सर्व मानके पूर्ण केल्याने या शेतकऱ्याची डाळिंबे थेट सातासमुद्रापार युरोपात विक्रीला गेली आहेत. युरोपवारीत पहिल्याच खेपेत त्यांना पाच लाख ऐंशी हजार रुपये मिळाल्याने त्यांच्यासह परिसरातील शेतकऱ्यांचा दुष्काळी परिस्थितीतही विश्वास दुणावला आहे. 

लाडसावंगी येथील शेतकरी रोहिदास कदम यांनी चार वर्षांपूर्वी एक हजार झाडांची डाळिंबाची बाग उभी केली. वास्तविक पाहता लाडसावंगी परिसर मोसंबीपाठोपाठ आता डाळिंब झोन म्हणून ओळखला जात आहे. दुष्काळामुळे अनेक शेतकऱ्यांच्या बागा नष्ट झाल्या तरी काही शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्यावर बागा जगविण्याची यशस्वी धडपड केली आहे. रोहिदास कदम यांना बाग जोपासताना, नेहमी दुष्काळाचा सामना करावा लागला. पुरेसा पाऊस नसल्याने डाळिंबाची बाग जगविणे हे या शेतकऱ्यासाठी मोठे दिव्य होते. या परिसरातील शेतकऱ्यांनी २०१२ साली पडलेल्या दुष्काळापासून चांगलाच धडा घेतला. शेतकऱ्यांनी आपल्या शेतात शेततळी तयार केली. पावसाळ्यात पडेल त्या पावसाच्या मदतीने ही शेततळी भरून ठेवली जातात. हे पाणी केवळ संकटकाळी वापरले जाते.

रोहिदास कदम यांनी डाळिंब बाग जोपासताना, केवळ जैविक खतांचा वापर केला. रासायनिक खते व कीटकनाशके त्यांनी आवर्जून टाळले. अत्यंत काटेकोर नियोजनाने त्यांनी डाळिंब बाग फुलवली. युरोपमध्ये फळे जाण्याअगोदर या डाळिंबाच्या फळांची मुंबई व युरोप येथील तपासणी केंद्रात तपासणी करून घेतली. या तपासणीसाठी त्यांना दहा हजार रुपये खर्च आला. तपासणीनंतर अहमदनगर जिल्ह्यातील के.बी. एक्स्पोर्टच्या माध्यमातून जवळपास पाच टन डाळिंब फळे युरोपला पाठवले. या डाळिंबाला युरोपच्या बाजारात ११६ रुपये प्रतिकिलो भाव मिळाला. पहिल्याच खेपेला त्यांना पाच लाख ऐंशी हजार रुपये मिळाले. अद्याप मोठ्या प्रमाणात माल झाडांवर बाकी आहे. युरोपच्या बाजारात जैविक पद्धतीने पिकविलेल्या मालाला मागणी आहे. रासायनिक वापराचा माल तिकडे स्वीकारला जात नाही.  

यात डाळिंब हे पीक अत्यंत नाजूक, किडके फळ म्हणून ओळखले जाते. वातावरणात थोडाफार जरी बदल झाल्यास तात्काळ रासायनिक कीटकनाशक फवारणी आपल्याकडील शेतकऱ्यांना करावी लागते. यात डाळिंब बाग धरल्यापासून ते माल विक्रीपर्यंत या बागांची चांगली निगा ठेवावी लागते. थोडी निष्काळजी झाल्यास संपूर्ण फळावर डाग, तसेच तेल्यारोग, करपा, मिलिबग, असे रोग या फळावर येतात. मात्र, या रासायनिक खते व कीटकनाशक फवारणी केलेली फळे विदेशात चालत नाहीत. याचा अभ्यास करून कदम यांनी जैविक पद्धतीने या बागेचे संगोपन केले.

Web Title: Aurangabad's farmer pomegranates directly into Europe market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.