व्हर्जिनिया विद्यापीठाच्या ‘ग्लोबल लीडरशिप प्रोग्राम’मध्ये औरंगाबादच्या गौरवची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2019 06:32 PM2019-06-06T18:32:55+5:302019-06-06T18:36:09+5:30
केवळ औरंगाबादचा नव्हे, संपूर्ण देशाचा गौरव
- विजय सरवदे
अमेरिकेतील व्हर्जिनिया विद्यापीठात दलाई लामा फेलोशिपसाठी जगभरातील ४० देशांतील अवघ्या २५ विद्यार्थ्यांची निवड केली जाते. यंदा या फेलोशिपसाठी २५ विद्यार्थ्यांमध्ये भारतातील तीन विद्यार्थ्यांची निवड झाली असून, त्यापैकी गौरव सोमवंशी हा औरंगाबादेतील एक विद्यार्थी आहे. ‘ग्लोबल लीडरशिप प्रोग्राम’ या विषयामध्ये गौरवने ‘ब्लॉकचेन’ या आधुनिक तंत्रज्ञानाची शेतकरी आणि समाजाच्या हितासाठी अंमलबजावणी व प्रसार करण्याचा सादर केलेला प्रस्ताव विद्यापीठाच्या पसंतीला उतरला आहे. गौरव सोमवंशी हा नंदनवन कॉलनी परिसरालगत संगीता कॉलनी येथील रहिवासी आहे. कान, नाक, घसातज्ज्ञ डॉ. ज्ञानदीप सोमवंशी यांचा तो चिरंजीव आहे. या फेलोशिपच्या पहिल्या सत्रात उपस्थित राहण्यासाठी तो नुकताच अमेरिकेला गेला आहे. जाता-जाता त्याने ‘लोकमत’शी साधलेला संवाद असा,
प्रश्न : दलाई लामा यांच्या नावामुळे ही फेलोशिप धार्मिकतेशी संबंधित वाटते?
गौरव : अमेरिकेतील व्हर्जिनिया विद्यापीठातील दलाई लामा यांच्या नावाने ‘ग्लोबल लीडरशिप’ ही संज्ञा घेऊन जगभरातील विद्वान, वैज्ञानिक, संशोधकांसाठी चालविण्यात येणारे हे अध्यासन केंद्र आहे. हे अध्यासन केंद्र पूर्णत: निधर्मी आहे.
प्रश्न : तुझी निवड नेमकी कशी झाली?
गौरव : दरवर्षी जानेवारीमध्ये या फेलोशिपसाठी जगभरातील ४० देशांतून ‘आॅनलाईन’ अर्ज मागविले जातात. विद्यापीठाला यासाठी यंदा हजारो अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी अवघ्या २५ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. यामध्ये अनेक देशांतील एकही विद्यार्थी निवडला गेला नाही.
प्रश्न : एवढ्या मोठ्या प्रतिष्ठेच्या फेलोशिपसाठी निवड कशी झाली?
गौरव : मी सध्या ‘ब्लॉकचेन’ या तंत्रज्ञानाचा अभ्यास करीत आहे. या विषयाचे अनेक शासकीय अधिकारी, प्राध्यापक, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत आहेत. १४ जून रोजी ‘यशदा’मध्ये आयोजित कार्यशाळेत वर्ग-१ च्या ४० शासकीय अधिकाऱ्यांना ‘ब्लॉकचेन’ची संकल्पना सांगितली. भारतात हे तंत्रज्ञान आपण सोशल मीडियासाठी वापरणार असून, त्याचा फायदा शेती, आरोग्य आणि सरकारी उपक्रमासाठी होणार आहे. हा माझा प्रोजेक्ट विद्यापीठाला आवडला आहे.
प्रश्न : ‘ब्लॉकचेन’ म्हणजे काय?
गौरव : ‘ब्लॉकचेन’ हे तंत्रज्ञान येत्या दहा-पंधरा वर्षांत आपल्याकडे लोकप्रिय होईल. सध्या या तंत्रज्ञानाचा अभ्यास मुंबई, दिल्ली व अहमदाबाद, अशा मोठमोठ्या शहरांमध्ये सुरू आहे. कोणत्याही मध्यस्थ संस्थेविना जगभरात कुठेही असलेल्या व्यक्तींमध्ये या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पारदर्शक व्यवहार घडवून आणता येऊ शकतो, हे बिटकॉइनने जगाला दाखवून दिले आहे. त्यामागील तंत्रज्ञान हे ‘ब्लॉकचेन’द्वारे जन्मास आले होते. ‘ब्लॉकचेन’मुळे अनेक अनोळखी वा विखुरलेल्या व्यक्ती, समूह किंवा व्यवस्था यांच्यात विश्वास निर्माण केला जाऊ शकतो आणि प्रक्रियेत पारदर्शकता येऊ शकते. त्यामुळे मध्यस्थ मंडळींची शक्ती आणि नियंत्रण कमी होणार. हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत हस्तांतरित केल्यास त्यांना त्यांच्या उत्पादनाचा योग्य मोबदला मिळू शकेल .
‘ब्लॉकचेन’ हे तंत्रज्ञान येत्या दहा-पंधरा वर्षांत लोकप्रिय होईल. सध्या याचा अभ्यास मुंबई, दिल्ली व अहमदाबाद या शहरांमध्ये सुरू आहे. ‘ब्लॉकचेन’मुळे अनेक अनोळखी वा विखुरलेल्या व्यक्ती, समूह किंवा व्यवस्था यांच्यात विश्वास निर्माण केला जाऊ शकतो आणि प्रक्रियेत पारदर्शकता येऊ शकते. आपण या तंत्रज्ञानाचा वापर शेती, आरोग्य आणि सरकारी उपक्रमासाठी करणार आहोत. - गौरव