औरंगाबादचे खुशी, तनवीर, शुभम, श्रवीन उमटवणार खेलो इंडियात ठसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2019 01:03 AM2019-01-16T01:03:26+5:302019-01-16T01:04:22+5:30
पुणे येथे सुरू असलेल्या खेलो इंडिया युथ गेम्समध्ये औरंगाबादची आंतरराष्ट्रीय खेळाडू खुशी डोंगरे, राष्ट्रीय खेळाडू तनवीरसिंग दरोगा, शुभम गवळी आणि श्रवीन तनवडे यांची महाराष्ट्राच्या बास्केटबॉल संघात निवड झाली आहे. नवी दिल्ली येथे नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धेत महाराष्ट्राचे कर्णधारपद भूषवणारी खुशी डोंगरे ही खेलो इंडिया युथ गेम्समध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहे, तर राष्ट्रीय खेळाडू शुभम गवळी व तनवीरसिंग दरोगा हे २१ वर्षांखालील आणि श्रवीन तनवडे हा महाराष्ट्राच्या १६ वर्षांखालील संघाकडून आपला ठसा उमटवण्यास आतुर असेल.
औरंगाबाद : पुणे येथे सुरू असलेल्या खेलो इंडिया युथ गेम्समध्ये औरंगाबादची आंतरराष्ट्रीय खेळाडू खुशी डोंगरे, राष्ट्रीय खेळाडू तनवीरसिंग दरोगा, शुभम गवळी आणि श्रवीन तनवडे यांची महाराष्ट्राच्या बास्केटबॉल संघात निवड झाली आहे.
नवी दिल्ली येथे नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धेत महाराष्ट्राचे कर्णधारपद भूषवणारी खुशी डोंगरे ही खेलो इंडिया युथ गेम्समध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहे, तर राष्ट्रीय खेळाडू शुभम गवळी व तनवीरसिंग दरोगा हे २१ वर्षांखालील आणि श्रवीन तनवडे हा महाराष्ट्राच्या १६ वर्षांखालील संघाकडून आपला ठसा उमटवण्यास आतुर असेल.
खुशी डोंगरेने याआधी १६ वर्षांखालील भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले असून, तिची १९ वर्षांखालील भारतीय संघाच्या शिबिरासाठीही निवड झाली होती. तिने आतापर्यंत ८ राज्यस्तरीय, ४ राष्ट्रीय व एका आंतरराष्ट्रीय स्पर्धेत ठसा उमटवला आहे. त्याचप्रमाणे तनवीरसिंग दरोगाने २१ वर्षांखालील फेडरेशन कप, १६ वर्षांखालील राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले आहे, तसेच तनवीरसिंग दरोगा आणि शुभम गवळी यांनी पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ बास्केटबॉल स्पर्धेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला सुवर्णपदक जिंकून देण्यात निर्णायक भूमिका बजावली आहे. त्याचप्रमाणे श्रवीन तनवडेने नवी दिल्ली येथे झालेल्या १९ वर्षांखालील राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले आहे. खुशी डोंगरे व शुभम गवळी यांना आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक संदीप ढंगारे यांचे मार्गदर्शन लाभले आहे, तर तनवीरसिंग दरोगा, श्रवीन तनवडे यांना प्रशिक्षक मनजितसिंग दरोगा यांचे मार्गदर्शन लाभले आहे. या निवडीबद्दल जिल्हा बास्केटबॉल संघटनेचे अध्यक्ष संजय डोंगरे, महेश भागवत, ज्ञानेश्वर जगताप, अभय सोभावने, सुशांत शेळके, खेमजी पटेल, संदीप सातदिवे, महेश इंगळे आदींनी खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.