मेहमूद गेटचे अवशेष पुन्हा निखळले; डागडुजीकडे दुर्लक्ष घेणार वास्तूचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 05:46 PM2021-07-09T17:46:36+5:302021-07-09T18:11:26+5:30

Mehmood Gate Aurangabad News : पाणचक्कीच्या दर्शनी भागातच मेहमूद गेट मागील ३५० वर्षांपासून दिमाखात उभा आहे.

Aurangabad's historic Mehmood Gate on the verge of collapse | मेहमूद गेटचे अवशेष पुन्हा निखळले; डागडुजीकडे दुर्लक्ष घेणार वास्तूचा बळी

मेहमूद गेटचे अवशेष पुन्हा निखळले; डागडुजीकडे दुर्लक्ष घेणार वास्तूचा बळी

googlenewsNext
ठळक मुद्देगेटच्या संरक्षणाचे ठोस उपाय न करता तात्पुरती डागडुजीवर भरयामुळे ऐतिहासिक वास्तूचा बळी जात असल्याचा इतिहासतज्ज्ञांचा रोष

औरंगाबाद : जगप्रसिद्ध पाणचक्कीसमोरील मेहमूद गेटचे अवशेष निखळण्यास आज पुन्हा सुरूवात झाली. गेटच्या आधारासाठी आतून लावलेला लोखंडी सांगाडा ट्रक आणि जेसीबीच्या धडकेने मोडून पडला आहे. यामुळे गेटच्यावरील भागातील आणखी काही अवशेष पुन्हा निखळले. काही दिवसांपूर्वी ट्रक अडकल्यानंतर गुरुवारी जेसीबीचा धक्का बसल्याने गेटचे मोठे नुकसान झाले आहे. गेटच्या संरक्षणाचे ठोस उपाय न करता तात्पुरती डागडुजी केल्याने ऐतिहासिक वास्तूचा बळी जात असल्याचा रोष इतिहासतज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

पाणचक्कीच्या दर्शनी भागातच मेहमूद गेट मागील ३५० वर्षांपासून दिमाखात उभा आहे. जगप्रसिद्ध पाणचक्की पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना याच गेटमधून पुढे जावे लागते. खाम नदीवरील हा बुलंद गेट पर्यटकांसाठीही आकर्षण केंद्र आहे. मागील वर्षी गेटच्या आतील सागवानी दरवाजा अचानक कोसळला होता. यानंतर एका ट्रकने गेटला जोरदार धडक दिल्याने गेटवरील भाग निखळला. तसेच संपूर्ण गेटला यामुळे नुकसान पोहचले होते. यामुळे गेटच्या संरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला. मात्र, महापालिका प्रशासनाने गेटच्या तात्पुरत्या डागडुजीवर भर दिला. गेटच्या आतून आधारासाठी लोखंडी सांगाडा लावण्यात आला. वाहनांच्या धडकेने खिळखिळा झालेला गेटचा सांगाडा त्यामुळे धरून राहिला. परंतु, मागील आठवड्यात एक ट्रक यात अडकला, तर गुरुवारी जेसीबीच्या धक्क्याने गेटच्या आधारासाठी लावलेला लोखंडी सांगाडा तुटला. यामुळे गेटच्या ढाच्याचे मोठे नुकसान झाले. यातच गुरुवारी झालेल्या पावसाने गेटचे मोठे-मोठे अवशेष निखळत आहेत. सध्या गेटमधून वाहतूक बंद करण्यात आली आहे. 

मेहमूद गेटचे अवशेष निखळले; इतिहासतज्ज्ञांचा महापालिकेवर रोष

गेटच्या दोन्ही बाजूने पूल कधी होणार ?
शहरात ५२ दरवाजांपैकी केवळ १४ दरवाजे शिल्लक राहिले आहेत. महापालिका प्रशासन या ऐतिहासिक दरवाजांकडे दुर्लक्ष करीत असल्याने यांची वाताहत होत असल्याचा आरोप इतिहासतज्ज्ञांनी केला आहे. मनपाने मेहमूद गेटच्या दोन्ही बाजूने पूल उभारून रस्ता करण्याची योजना आखली आहे. त्याची अंमलबजावणी आजपर्यंत झाली नाही. उद्या गेट पडून निष्पाप नागरिकांचा जीव गेल्यावर महापालिका डागडुजी करणार आहे का? असा सवाल इतिहासतज्ज्ञ करत आहेत.

ट्रकच्या धडकेत ऐतिहासिक मेहमूद दरवाजाचा वरचा भाग निखळला

Web Title: Aurangabad's historic Mehmood Gate on the verge of collapse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.