'औरंगाबादची जागा शिवसेनेचीच, तयारीला लागा'; मुख्यमंत्र्यांचा पदाधिकारी, नेत्यांना संदेश
By बापू सोळुंके | Published: April 15, 2024 11:33 AM2024-04-15T11:33:52+5:302024-04-15T11:34:50+5:30
मुख्यमंत्र्यांची मध्यरात्री विमानतळावर पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा
छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद लोकसभेची जागा शिवसेनेची आहे. निवडणुकीची तयारी करा, कार्यकर्त्यांचे मेळावे घ्या, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी रात्री चिकलठाणा विमानतळावर पक्ष पदाधिकाऱ्यांना दिले.
बुलढाणा येथील प्रचारसभा आटोपून मुख्यमंत्री मुंबईला जाण्यासाठी रविवारी रात्री ११.४५ वाजता चिकलठाणा विमानतळावर आले होते. यावेळी त्यांच्या स्वागतासाठी आ. संजय शिरसाट, जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ, युवासेनेचे ऋषिकेश जैस्वाल, नीलेश शिंदे आणि विनोद पाटील उपस्थित होते. यानंतर त्यांनी पदाधिकाऱ्यांकडून पुष्पगुच्छ स्वीकारले आणि त्यांच्या सोबत छायाचित्रेही काढू दिली. पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांचा जयघोष केला. नंतर ते विमानतळाच्या आत गेले.
तेथे त्यांनी आ. शिरसाट, जंजाळ आणि अन्य पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करताना औरंगाबादची जागा शिवसेनेचीच आहे. तुम्ही निवडणुकीच्या तयारीला लागा, दोन दिवसांत जागावाटप होईल, असे स्पष्टपणे सांगितल्याचे सूत्रांनी सांगितले. यामुळे औरंगाबाद लोकसभेची निवडणूक शिंदेसेनाच लढणार असल्याचे आता अंतिम झाल्याचे सूत्रांनी सांगितले. यानंतर मुख्यमंत्र्यांनी आ. शिरसाट, जंजाळ आणि लोकसभेसाठी शिंदेसेनेकडून इच्छुक उमेदवार विनोद पाटील यांच्याशी स्वतंत्र चर्चा केली. उभय नेत्यांमध्ये काय चर्चा झाली, याबाबतची माहिती समजू शकली नाही. सुमारे अर्धा तास मुख्यमंत्री विमानतळावर होते. नंतर ते चार्टर्ड विमानाने मुंबईला रवाना झाले.
विनोद पाटील यांना विमानतळावर बोलावले
विनोद पाटील यांचा रविवारी वाढदिवस असल्याचे समजल्याने मुख्यमंत्र्यांनी त्यांना चिकलठाणा विमानतळावर बोलावून घेतले हाेते. मुख्यमंत्र्यांचा ताफा विमानतळावर येण्यापूर्वीच पाटील हे तेथे हजर होते. मुख्यमंत्र्यांनी विनोद पाटील यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या जेवणाचा डबाही पाटील यांनी दिल्याचे सूत्रांनी सांगितले.