निधी नसल्याने औरंगाबादच्या मॉडेल रेल्वेस्टेशनचा दुसरा टप्पा रेंगाळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2018 03:03 PM2018-02-10T15:03:24+5:302018-02-10T15:03:59+5:30
मॉडेल रेल्वेस्टेशनच्या दुसर्या टप्प्यातील काम गेल्या अडीच वर्षांपासून रेंगाळले आहे. निधीअभावी हे काम २०१८ मध्येही सुरू होण्याची शक्यता नाही. दुसरीकडे एसटी महामंडळाकडून मध्यवर्ती बसस्थानकात उभारण्यात येणारे ‘बसपोर्ट’देखील रखडले आहे. केवळ कागदोपत्रीच प्रवाशांना सुसज्ज सोयी-सुविधांची स्वप्ने दाखविली जात आहेत.
औरंगाबाद : मॉडेल रेल्वेस्टेशनच्या दुसर्या टप्प्यातील काम गेल्या अडीच वर्षांपासून रेंगाळले आहे. निधीअभावी हे काम २०१८ मध्येही सुरू होण्याची शक्यता नाही. दुसरीकडे एसटी महामंडळाकडून मध्यवर्ती बसस्थानकात उभारण्यात येणारे ‘बसपोर्ट’देखील रखडले आहे. केवळ कागदोपत्रीच प्रवाशांना सुसज्ज सोयी-सुविधांची स्वप्ने दाखविली जात आहेत.
औरंगाबाद रेल्वेस्टेशनचा मॉडेल रेल्वेस्टेशनमध्ये समावेश झाला आणि पहिल्या टप्प्यात भव्य इमारत उभी राहिली. मॉडेल रेल्वेस्टेशनच्या दुसर्या टप्प्यात रेल्वेस्टेशनच्या जुन्या इमारतीच्या जागेत विकासकामे केली जाणार आहेत. पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर तात्काळ दुसर्या टप्प्यातील काम सुरू होणे अपेक्षित होते; परंतु तसे झाले नाही. ३ जुलै २०१५ रोजी दुसर्या टप्प्यातील जुन्या इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजनही झाले; परंतु अडीच वर्षांनंतरही हे काम सुरूच झालेले नाही. निधी मिळाल्यानंतर काम रेल्वेस्टेशनचे काम पर्यटन मंत्रालयाच्या सहकार्याने केले जाणार आहे; परंतु रेल्वेकडे निधी नाही. याबरोबर पर्यटन मंत्रालयाकडूनही निधी उपलब्ध झालेला नाही, असे दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाचे व्यवस्थापक (डीआरएम) त्रिकालज्ञ राभा म्हणाले.
पर्यटकही अवाक्
रेल्वेस्टेशनच्या जुन्या इमारतीची ठिकठिकाणी पडझड झाली आहे. मध्यवर्ती बसस्थानकाची इमारतही गेल्या दहा वर्षांत जीर्ण झाली आहे. छताचे प्लास्टर ठिकठिकाणी कोसळले आहे. भिंतीमधून पाणी झिरपते. ही अवस्था पाहून सर्वसामान्य प्रवाशांबरोबर पर्यटकही अवाक् होत आहेत. बसपोर्टची निविदा प्रक्रिया सुरू असल्याची माहिती एसटी महामंडळाच्या जनसंपर्क विभागातर्फे देण्यात आली.
अर्थसंकल्पात नुकतीच औरंगाबाद रेल्वेस्टेशनच्या बदलासाठी एकीकडे यंदा एक हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, तर दुसरीकडे औरंगाबाद, हैदराबाद, नांदेड, तिरुपती रेल्वेस्टेशनचा पर्यटन मंत्रालयाच्या सहकार्याने विकास करण्यासाठी ७५ लाखांचा निधी देण्यात आला आहे. त्यामुळे एवढ्याशा निधीतून रेल्वेस्टेशनवर कामे कशी होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे वर्षभरात जुन्या इमारतीच्या जागी विकासकामे सुरू होणे अवघड आहे.
याबरोबरच जानेवारी २०१६ मध्ये औरंगाबादसह इतर काही शहरांमध्ये बसपोर्ट उभारण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. मध्यवर्ती बसस्थानकाच्या जागेवर ‘डिझाईन-बिल्ड-फायनान्स-ट्रान्स्फर-लीज’ या तत्त्वावर बसपोर्ट बांधण्यात येणार आहे.
बसपोर्ट जाहीर केल्याच्या तब्बल वर्षभरानंतर म्हणजे जानेवारी २०१७ मध्ये एसटी महामंडळातर्फे औरंगाबादसह राज्यातील ९ शहरांत उभारण्यात येणार्या बसपोर्टसाठी निविदा प्रक्रिया जाहीर करण्यात आली; परंतु अद्यापही प्रत्यक्षात बसपोर्टचे काम सुरू होत नाही.