औरंगाबादच्या मॉडेल रेल्वेस्टेशनचा दुसरा टप्पा ३ वर्षांपासून कागदावरच...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2018 20:26 IST2018-11-30T20:25:33+5:302018-11-30T20:26:15+5:30
भूमिपूजनाच्या तीन वर्षांनंतरही दुसऱ्या टप्प्यातील कामाचा आराखडा (डिझाईन) पूर्ण झालेली नसल्याची माहिती समोर आली आहे.

औरंगाबादच्या मॉडेल रेल्वेस्टेशनचा दुसरा टप्पा ३ वर्षांपासून कागदावरच...!
औरंगाबाद : मॉडेल रेल्वेस्टेशनच्या दुसऱ्या टप्प्यातील काम गेल्या तीन वर्षांपासून कागदावरच आहे. भूमिपूजनाच्या तीन वर्षांनंतरही दुसऱ्या टप्प्यातील कामाचा आराखडा (डिझाईन) पूर्ण झालेली नसल्याची माहिती समोर आली आहे.
औरंगाबाद रेल्वेस्टेशनचा मॉडेल रेल्वेस्टेशनमध्ये समावेश झाला आणि पहिल्या टप्प्यात भव्य इमारत उभी राहिली. मॉडेल रेल्वेस्टेशनच्या दुसऱ्या टप्प्यात रेल्वेस्टेशनच्या जुन्या इमारतीच्या जागेत विकासकामे केली जाणार आहेत. पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर तात्काळ दुसऱ्या टप्प्यातील काम सुरू होणे अपेक्षित होते; परंतु तसे झाले नाही. तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते ३ जुलै २०१५ रोजी दुसऱ्या टप्प्यातील जुन्या इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजनही झाले; परंतु तीन वर्षे उलटल्यानंतरही हे काम सुरूच झालेले नाही.
रेल्वेस्टेशनचे काम पर्यटन मंत्रालयाच्या सहकार्याने करून देश-विदेशातील पर्यटकांना नजरेसमोर ठेवून सुविधा दिल्या जातील, असे रेल्वे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले; परंतु प्रवाशांना सुसज्ज सोयी-सुविधांची स्वप्ने दाखविली जात असून, रेल्वे अधिकाऱ्यांचे म्हणणे हे फक्त ‘बोलाचाच भात’ ठरते आहे.
दुरवस्थेवर वरवर पांघरून
स्टेशनच्या जुन्या इमारतीची पडझड झालेली आहे. ‘दमरे’चे महाव्यवस्थापक विनोदकुमार यादव यांचा १२ डिसेंबर रोजी औरंगाबाद स्टेशनवर पाहणी दौरा आहे. त्यामुळे जुन्या स्टेशनच्या इमारतीची रंगरंगोटी आणि फरशा बदलून दुरवस्थेवर के वळ वरवर पांघरून घातले जात असल्याची ओरड प्रवाशांतून होत आहे.
चांगल्या कामास प्राधान्य
रेल्वे स्टेशनच्या दुसऱ्या टप्प्यातील कामाची डिझाईन अंतिम केली जात आहे. अधिकाधिक चांगले काम करण्यास प्राधान्य दिले जात असल्याचे दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाचे व्यवस्थापक (डीआरएम) त्रिकालज्ञ राभा यांनी सांगितले.