औरंगाबादेत ‘त्या’ नाल्याने घेतला बळी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2018 12:03 AM2018-06-21T00:03:00+5:302018-06-21T00:11:55+5:30
मंगळवारी रात्री झालेल्या वादळी पावसामुळे ओव्हरफ्लो होऊन वाहणाऱ्या नाल्यात पडल्यामुळे वाहून गेलेल्या मजुराचा मृत्यू झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : मंगळवारी रात्री झालेल्या वादळी पावसामुळे ओव्हरफ्लो होऊन वाहणाऱ्या नाल्यात पडल्यामुळे वाहून गेलेल्या मजुराचा मृत्यू झाला. ही खळबळजनक घटना जयभवानीनगर येथील चौकाजवळ घडली. वीस वर्षांपासून उघड्या नाल्यावर ढापा टाकण्यास व त्याच्या साफसफाईकडे दुर्लक्ष करणाºया मनपाने हा बळी घेतल्याचा आरोप नागरिकांनी केला.
भगवान निवृत्ती मोरे (५०, मूळ रा. पवनी, ता. सेनगाव, जि. हिंगोली, ह. मु. जयभवानीनगर) असे मृताचे नाव आहे. प्रत्यक्षदर्शी आणि पोलिसांनी सांगितले की, मंगळवारी रात्री दहा वाजता जोरदार पाऊस झाला. यामुळे सिडको एन-३, एन-४ मधून जयभवानी नगरकडे वाहणाºया नाल्याला पूर आला होता.
जयभवानीनगर ते मुकुंदवाडी रेल्वेस्टेशन रस्त्यावरील या नाल्यावर सिमेंटचे पाईप टाकून पूल करण्यात आलेला आहे. पुलाच्या डाव्या आणि उजव्या बाजूला नाल्याचे तोंड उघडे आहे. डाव्या बाजूला सिमेंटची जाळी नागरिकांनीच टाक ली आहे तर उजव्या बाजूचे नाल्याचे तोंड उघडे आहे.
मंगळवारी रात्री सव्वादहा वाजेच्या सुमारास पावसाचे पाणी या नाल्याच्या उघड्या बाजूने ओसंडून रस्त्यावरून वाहत होते. त्याच वेळी भगवान मोरे हे दुधाची बॅग घेऊन पायी घरी जात होते. वीज गुल झाल्याने अंधारामुळे रस्त्याच्या कडेला उघड्या नाल्याचा अंदाज त्यांना न आल्याने ते नाल्यात पडले आणि वाहून गेले.ही घटना त्यांच्या मागून जात असलेल्या बालाजी माणिकराव जाधव यांनी पाहिली.
त्यांनी अन्य लोकांच्या मदतीने त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र अंधारात आणि नाल्याच्या पाण्यात त्यांना ते दिसत नव्हते. त्यांनी अग्निशमन दल आणि पोलिसांना घटनेची माहिती दिली. फायर ब्रिगेडने घटनास्थळी धाव घेऊन त्यांचा शोध घेतला, मात्र त्यांना शोधण्यात यश आले नाही.
सकाळी सापडला मृतदेह
बुधवारी सकाळी परिसरातील नागरिकांनी पुन्हा भगवान मोरे यांचा शोध सुरू केला. तेव्हा परिसरातील नागरिक विजय साळुंके यांनी नाल्यात उतरून खाली पाहिले असता भगवान मोरे यांचा मृतदेह नाल्यातील गाळात आणि प्लास्टिक, नळाच्या पाण्याच्या पाईपमध्ये अडकलेला दिसला.
त्यानंतर त्यांनी फायर ब्रिगेडला घटनास्थळी बोलावून घेतले. फायर ब्रिगेडच्या जवानांनी हा मृतदेह बाहेर काढून घाटी रुग्णालयात पाठविला. याप्रकरणी मुकुंदवाडी ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
नागरिकांचा प्रखर रोष
महापौर नंदकुमार घोडेले, अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग, शहर अभियंता सखाराम पानझडे यांच्यासह मनपा अधिकाºयांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांना उपस्थित नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. आणखी किती जणांचे बळी घेणार? असा सवाल नागरिकांनी केला.
वीजपुरवठा होता खंडित
मंगळवारी रात्री जोरदार पाऊस सुरू होताच वीजपुरवठा खंडित झाला. परिणामी सिडको, जयभवानीनगर, पुंडलिकनगर, हनुमाननगर आदी वसाहतीत अंधार पसरला होता. अंधारात भगवान मोरे यांना उघड्या नाल्यातून वाहणाºया पाण्याचा अंदाज आला नाही.
महापालिका उपायुक्त
रवींद्र निकम निलंबित
औरंगाबाद : जयभवानीनगर येथील नाल्यात बुडून भगवान मोरे यांचा बुधवारी पहाटे मृत्यू झाला. नाल्यातील अतिक्रमण काढण्यास दिरंगाई केल्याबद्दल उपायुक्त रवींद्र निकम यांना मनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी सकाळी तडकाफडकी निलंबित केले. त्यानंतर सुरू झालेल्या सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी जयभवानीनगरप्रकरणी प्रशासनाचे वाभाडे काढले. या घटनेला जबाबदार अधिकाºयांचा शोध घेऊन कारवाईची मागणी करण्यात आली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन या प्रकरणाची आपण स्वत: सखोल चौकशी करणार असल्याचे आयुक्तांनी घोषित केले. महापौर नंदकुमार घोडेले यांनी मोरे कुटुंबियांना पाच लाख रुपये आर्थिक मदत देण्याचे जाहीर केले.
शहरात मंगळवारी रात्री दहा वाजता जोरदार पाऊस झाला. त्यामुळे जयभवानीनगरातील नाले तुडुंब भरले. रस्त्यांवर अडीच ते तीन फुटांपर्यंत पाणी वाहत होते. पाण्यामुळे नाल्यातील खड्डा भगवान मोरे यांना दिसला नाही. ते यात पडले. काही अंतरावर वाहत जाऊन ते अडकले. पाणी जास्त असल्याने त्यांना बाहेर येणे जमलेच नाही. पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला. सकाळी ही बाब निदर्शनास आली. या घटनेमुळे महापालिकेत एकच खळबळ उडाली. आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी तात्काळ उपायुक्त रवींद्र निकम यांना निलंबित केले.
जयभवानीनगरातील नाल्यातील अतिक्रमणे काढण्याची जबाबदारी निकम यांच्यावर सोपविण्यात आली होती. काही अतिक्रमणे जशास तशी आहेत.