औरंगाबादचे नाव विश्वपटलावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2017 01:43 AM2017-11-05T01:43:31+5:302017-11-05T01:45:23+5:30
क्रांतीचौकातील झांशी की राणी या पूर्वीच्या उद्यानाला औरंगाबाद मनपा स्वातंत्र्य संग्राम स्मारक असे नाव तेथे उभारण्यात आलेल्या २१० फूट राष्ट्रध्वज स्तंभामुळे शहराचे नाव विश्वपटलावर आले
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : क्रांतीचौकातील झांशी की राणी या पूर्वीच्या उद्यानाला औरंगाबाद मनपा स्वातंत्र्य संग्राम स्मारक असे नाव तेथे उभारण्यात आलेल्या २१० फूट राष्ट्रध्वज स्तंभामुळे शहराचे नाव विश्वपटलावर आले असून, या शहराच्या ऐतिहासिकतेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या उपस्थितीत त्या ध्वजस्तंभाचे लोकार्पण शनिवारी पार पडले. याप्रसंगी बोलताना राज्यपालांनी भाषणाच्या सुरुवातीलाच नमूद केले, औरंगाबाद शहर हे ऐतिहासिक शहरांपैकी एक आहे. १८५७ च्या राष्ट्रीय उठावाची साक्ष देणारे क्रांतीचौक हे स्थळ विश्वपातळीवरील मानचित्र म्हणून आपली वेगळी ओळख बनविण्यासाठी चालले आहे. राज्यपालांच्या या गौरवोद्गारामुळे औरंगाबाद शहराला पर्यटनाच्या दृष्टीने आणि ध्वजस्तंभामुळे आणखी महत्त्व येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
आंतरराष्ट्रीय पातळीवर आणि इंटरनेट सर्च इंजिनवरदेखील त्याचा गवगवा होण्यास सुरुवात झाली आहे.
गुगल सर्च इंजिनवर क्रांतीचौक ध्वजस्तंभ असे सर्च केल्यास त्यासंबंधीची माहिती येण्यास सुरुवात झाली आहे. ५४ बाय ३६ चा हा स्तंभावरील ध्वज आहे. त्यावर सर्च लाईट लावण्यात आला आहे. हे अष्टकोनी स्मारक आहे. आठ छोटे स्तंभ असून, त्यावर राजचिन्ह आहे.
राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या संकल्पनेतून हा ध्वजस्तंभ उभा राहिला आहे. मराठवाडा-हैदराबाद मुक्तिसंग्राम लढ्यातील करीमनगर या जिल्ह्याचे राज्यपाल रहिवासी आहेत. या प्रांताच्या संवेदना त्यांना माहिती असल्यामुळे प्रेरणादायी ध्वजस्तंभ उभारण्याची संकल्पना त्यांनी मांडल्याचे विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी सांगितले. तत्कालीन विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट यांच्या उपस्थितीत या उपक्रमासाठी पहिली बैठक झाली होती.