औरंगाबादच्या नीरजने जिंकली आॅल इंडिया रँकिंग टेनिस स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 12:24 AM2018-09-25T00:24:35+5:302018-09-25T00:25:24+5:30
विभागीय क्रीडा संकुलातील टेनिस केंद्रावर नुकत्याच झालेल्या १२ व्या आॅल इंडिया रॅकिंग टॅलेंट सिरीज टेनिस स्पर्धेत औरंगाबादच्या नीरज रिंगणगावकर याने विजेतेपद पटकावले. मुलींच्या गटात पुणे येथील अलिना शेख अजिंक्य ठरली.
औरंगाबाद : विभागीय क्रीडा संकुलातील टेनिस केंद्रावर नुकत्याच झालेल्या १२ व्या आॅल इंडिया रॅकिंग टॅलेंट सिरीज टेनिस स्पर्धेत औरंगाबादच्या नीरज रिंगणगावकर याने विजेतेपद पटकावले. मुलींच्या गटात पुणे येथील अलिना शेख अजिंक्य ठरली.
मुलांच्या गटात झालेल्या अंतिम सामन्यात औरंगाबादच्या नीरज रिंगणगावकर याने नाशिकच्या अद्वैत भातखंडे याचे आव्हान ६-४, ६-३ असे मोडीत काढताना विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. तत्पूर्वी निरज रिंगणगावकर याने उपांत्य फेरीत औरंगाबादच्या पार्थ सोमाणी याचा ९-४ आणि अद्वैत भाखंडे याने नाशिकच्या लक्ष गुजरातीचा ९-६ असा पराभव करीत अंतिम फेरी गाठली होती. मुलींच्या गटातील अंतिम सामन्यात पुण्याच्या अलिना शेख हिने कोल्हापूरच्या नैनिका रेड्डी हिच्यावर ६-१, ६-१ अशी मात करीत अजिंक्यपद पटकावले. अलिनाने उपांत्य फेरीत नाशिकच्या धनश्री पाटील हिचा ९-४ व नैनिका रेड्डी हिने नांदेडच्या तेजस्विनी शिरफुले हिचा ९-२ असा पराभव करीत अंतिम फेरी गाठली होती. अंतिम सामन्यानंतर जिल्हा क्रीडा अधिकारी अशोक गिरी, सचिन पुरी, टुर्नामेंट सुपरवायझर प्रवीण गायसमुद्रे, गजेंद्र भोसले, आशुतोष मिश्रा यांच्या उपस्थितीत विजेत्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.